मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बुधवारी, म्हणजेच 4 मे ला अचानक रेपो दरात वाढ केली आहे. ज्यामुळे देशातील करोडो लोकांना धक्का बसला आहे. RBI च्या या बदलामुळे सर्वसामान्यांवर देखील परिणम होणार आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर कदाचित तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, हा अचानक बदल करण्याची काय गरज होती? तर आम्ही यामागील कारण आणि त्याचा सामान्यांवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहोत.
त्यापूर्वी आपण रेपो रेट म्हणजे काय? हे आधी समजून घेऊ
RBI कडून बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते, त्याला रेपो दर म्हणतात. रेपो रेट वाढल्याने बँकांना RBI कडून जास्त दराने कर्ज मिळेल. यामुळे गृह कर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्ज इत्यादीवरील व्याजदर वाढतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या EMI वर होईल.
RBI ने प्रमुख धोरण रेपो रेट (Repo Rate) 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्के केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत रोख राखीव प्रमाण (CRR) 0.50 टक्क्यांनी वाढवून 4.5 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खरंतर रिटेल इंफेलशन रेट गेल्या तीन महिन्यांपासून ६ टक्क्यांच्या वर राहिला आहे. किरकोळ महागाई दर 2 टक्के फरकासह 4 टक्के राखण्याची जबाबदारी मध्यवर्ती बँकेवर सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत झपाट्याने वाढणाऱ्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो दरात वाढ करण्याचे पाऊल मध्यवर्ती बँकेने उचलले. या निर्णयामुळे कंपन्या आणि लोकांना कर्ज घेणे महागात पडणार आहे.
RBI ने ऑगस्ट 2018 नंतर प्रथमच रेपो दरात वाढ केली आहे. तब्बल चार वर्षांनंतर केंद्रीय बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. एमपीसीने कोणत्याही नियोजित कार्यक्रमाशिवाय बैठक घेऊन व्याजदर वाढवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
एमपीसीच्या बैठकीत सर्व 6 सदस्यांनी एकमताने धोरणात्मक दर वाढवण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी, केंद्रीय बँकेने 22 मे 2020 रोजी रेपो दरात सुधारणा केली होती. याअंतर्गत मागणी वाढवण्याच्या उद्देशाने रेपो दर ४ टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर आणण्यात आला.
रेपो रेट वाढवण्याचा परिणाम तुमच्या गृहकर्ज, कार कर्ज किंवा इतर कोणत्याही कर्जावर होईल. जर तुमचे आधीच कर्ज चालू असेल किंवा तुम्ही कर्ज घेणार असाल तर येत्या काही दिवसांत बँकेकडून व्याजदर वाढल्यामुळे ईएमआय पूर्वीपेक्षा जास्त वाढू शकतो. याचा परिणाम नवीन आणि जुन्या ग्राहकांवर होणार आहे.