विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद: आपण ज्या रेशनिंग दुकानातून धान्याची खरेदी करत आहेत. तीच रेशनदुकानं लवकरच कात टाकणारं आहेत. रेशनिंग दुकानांच्या माध्यमातून पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड तसच इतर सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्वसामान्य नागरिकांची पायपीट थांबावी तसच त्यांना सोयीच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारनं एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
आता तुम्ही रेशन दुकानातही पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. इतकंच नाही, तर वीज आणि पाण्याचं बिलदेखील रेशन दुकानांमध्ये भरता येऊ शकतं. केंद्रीय अन्न मंत्रालयानं ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडसोबत ही योजना तयार केली आहे.
देशातील सर्व रेशन दुकानं आता कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) बनवली जाणार आहे. त्याद्वारे नागरीकांना अनेक सुविधा पुरविण्यात येतील. सामान्य नागरिकांना रेशन दुकानात पासपोर्ट आणि पॅनकार्डसाठी अर्ज करता येईल. याशिवाय आधारकार्ड, लाईट बिल भरणे, पाण्याचं बिल भरणे आणि निवडणूक आयोगाशी संबंधित कामांची सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. रेशन धान्य दुकान चालवणाऱ्या दुकानदारांना सुविधा पुरवण्याबाबत निवड करता येणार आहे.
सर्व सोयीसुविधा एकाच छताखाली मिळणार असल्यानं लोकांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. रेशन दुकानांना मल्टिटास्किंग बनवण्याचा सरकारचा उपक्रम कौतुकास्पद असला तरी सध्याची रेशन दुकानांची स्थिती भूषणावह नाही. त्यामुळे नियोजनाकडे तितकच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.