अलीगड : मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं 'तीन तलाक' मताधिक्यानं घटनाबाह्य ठरवून या पद्धतीवर बंदी आणल्यानंतर या निर्णयावर समाजातील अनेक स्थरांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं.
अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीत अशीच एक घटना पाहायला मिळाली. 'इंडिया टुडे' या वृत्त वाहिनीच्या एका महिला प्रतिनिधीला आणि मीडियासमोर येऊन उघडपणे न्यायालयाच्या निर्णयाचं समर्थन करत 'तीन तलाक' पद्धतीवर टीका करणाऱ्या सुशिक्षित तरुणींना कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तरुणांच्या टोळक्यानं विरोध केला... इतकंच नाही तर त्यांनी या महिलांना धक्काबुक्कीही केली... आणि हा सगळा प्रकार युनिव्हर्सिटीच्या परिसरातच घडत होता.
इलमा हसन नावाची एक महिला पत्रकार काही तरुणींशी संवाद साधत होती... मुस्लिम युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या काही तरुणी आपली मतं मांडण्यासाठी उत्सुक होत्या... न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर त्यांनी आनंद आणि आशावादही व्यक्त केला... परंतु, तेवढ्यातच याच युनिव्हर्सिटीत शिकण्याचा दावा करणाऱ्या तरुणांच्या एका घोळक्यानं या महिलांना घेरलं...
त्यांच्या या वर्तवणुकीमुळे महिला रिपोर्टरला आपलं 'लाईव्ह रिपोर्टिंग' मध्येच थांबवावं लागलं... 'तिथं उपस्थित महिलांना बोलायचं होतं... त्यांना आपली मतं मांडायची होती... परंतु, परिस्थिती चिघळल्यामुळे मला त्यांची मतं कॅमेऱ्यासमोर दाखवता आली नाही' अशी खंत इलमा यांनी व्यक्त केली.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच याच परिसरात वार्तांकन करणाऱ्या दुसऱ्या एका चॅनलच्या प्रतिनिधीनं हस्तक्षेप करत घोळक्याच्या तावडीतून महिला रिपोर्टर आणि कॅमेरामनला बाहेर काढलं.
दरम्यान या घटनेवर काहीही बोलण्यास युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिलाय. पत्रकार संघटनांनी मात्र या घटनेचा निषेध केलाय.