Video : आता कशाला आलात? संतप्त महिलेने आमदाराच्या लगावली कानाखाली

Haryana Flood : हरियाणात एका महिलेने जेजेपी आमदाराला सगळ्या गावासमोर कानाखाली मारली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेजेपी आमदार ईश्वर सिंह एका पुराचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली.

आकाश नेटके | Updated: Jul 13, 2023, 09:39 AM IST
Video : आता कशाला आलात? संतप्त महिलेने आमदाराच्या लगावली कानाखाली title=

Haryana JJP MLA Ishwar Singh : देशाच्या उत्तरेतील राज्यांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश नद्यांना पूर आला असून अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. हरिणायमध्येही (Haryana) पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. अशातच हरियाणातील कैथलमध्ये पूरपरिस्थिती पाहायला गेलेल्या जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) आमदार ईश्वर सिंह (JJP MLA Ishwar Singh) यांना एका महिलेने सर्वांसमोर कानाखाली मारली आहे. त्यानंतर गावाकऱ्यांनी ईश्वर सिंह यांना धक्काबुक्की देखील केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

घग्गर नदीचा बंधारा फुटल्यानंतर गावात आलेल्या पुराच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार ईश्वर सिंह हे चीका परिसरातील भाटिया गावात पोहोचले होते. त्यावेळी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी तुम्ही पाच वर्षे आम्हाला विचारलं नाही मग आता कशाला आला आहात? असा सवाल ईश्वर सिंह यांना विचारला. त्यानंतर लोकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे संतप्त झालेल्या ईश्वर सिंह यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र ते ऐकायला तयार नव्हते. गावकरी आधीच नाराज होते. त्याचवेळी संतप्त झालेल्या एका वृद्ध महिलेने गर्दीत ईश्वर सिंह यांना कानाखाली लगावली. अचानक हल्ला झाल्याने ईश्वर सिंह यांनाही काही कळलं नाही. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना गाडीत बसवून गावाबाहेर घेऊन गेले.

आमदार ईश्वर सिंह बुधवारी दुपारी घग्गरच्या आसपासच्या गावांतील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले होते. तीन बाजूंनी बांध फुटल्याने भाटिया गाव जलमय झाले आहे. गावकऱ्यांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. बांधातून पाणी अडवण्यासाठी प्रशासनाकडून जेसीबीही पुरविण्यात आला नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या मनात ईश्वर सिंह यांच्याविरुद्ध राग होता. त्यानंतर आमदार ईश्वर सिंह भाटिया गावात पोहोचताच गावकऱ्यांनी त्यांना घेराव घातला आणि घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, गावातील वृद्ध महिलाही जमा झाल्या. त्यातील एका महिलेने ईश्वर सिंह यांना शिवीगाळ करत कानाखाली मारली.

मी महिलेला माफ केले आहे - ईश्वर सिंह

महिलेने कानाखाली मारल्यानंतर ईश्वर सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट दिला आहे. त्या महिलेवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नसल्याचे ईश्वर सिंह यांनी सांगितले. मी त्या महिलेला माफ केले आहे, असे ईश्वर सिंह म्हणाले.

पावसामुळे हरिणायमध्ये सात जणांचा मृत्यू

सरकारी आकडेवारीनुसार, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे मृत पावलेल्यांची संख्या 18 वर पोहोचली आहे. त्यापैकी सात मृत्यू हरियाणामध्ये झाले आहेत. हरियाणामध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे.