दीपक भातुसे, झी मीडिया, सिंधुदुर्ग: शिवसेना विरुद्ध राणे यांच्यातील द्वंद्वामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. कणकवली मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर लढत असलेल्या नितेश राणे यांच्यावर शिवसेनेकडून सातत्याने टीका सुरु आहे. या टीकेला सोमवारी नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले.
शिवसेनेच्या नेत्यांनी नितेश यांच्यावर टीका करण्याचे कारणच काय आहे? शिवसेनेचा एकतरी आमदार गेल्या पाच वर्षांमध्ये नितेश यांनी मतदारसंघात केलेल्या कामाची बरोबरी करू शकतो का, असा रोकडा सवाल नारायण राणे यांनी विचारला. ते सोमवारी 'झी २४ तास'ला दिलेल्या खास मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेविषयीची नेमकी भूमिका स्पष्ट करण्यास नकार दिला. मात्र, वेळ पडल्यास 'अरेला कारे करू', अशा पवित्र्यात नारायण राणे दिसून आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी कणकवलीत प्रचारासाठी येत आहेत. यावेळी त्यांनी तुमच्यावर टीका केल्यास काय करणार, असा सवाल नारायण राणे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी टीका केल्यावर आम्ही पाहू, असे राणेंनी म्हटले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या कणकवलीतील प्रचारसभेविषयी तुर्तास काहीही बोलायचे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेबाबतच्या भूमिकेवरून राणे बंधूंमध्ये मतभेद
कणकवलीत विरोधात उमेदवार उभा करून शिवसेना युतीचं पावित्र्य ठेवत नसेल तर ती गोष्ट भाजपने पाहून घ्यावी. कणकवलीत विरोधात उमेदवार उभा करून शिवसेना युतीचं पावित्र्य ठेवत नसेल तर ती गोष्ट भाजपने पाहून घ्यावी. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेशी मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला तर त्याला मी प्रतिसाद देईन. परंतु, हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे, असे राणे यांनी सांगितले.
शिवसेना नेतृत्त्वाशी जुळवून घेण्यास तयार असलेल्या नारायण राणे यांचा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवरील राग कायम असल्याचे यावेळी दिसून आले. शिवसेनेचे स्थानिक उमेदवार आणि मंत्री काय पात्रतेचे आहेत, हे सिंधुदुर्गातील जनतेला माहिती आहे. त्यांना माझे कार्यकर्ते योग्य ते प्रत्यु्तर देतील. तसेच शिवसेना म्हणजेच महाराष्ट्राचे राजकारण आहे का? भाजपमधील निम्म्या नेत्यांचे शिवसेनेशी जुळत नाही. त्यामुळे अशा गोष्टींनी फार काही बदलत नसते, असे राणेंनी सांगितले.