Husband Wife Relation: कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात मित्र आणि जोडीदार असे दोन महत्त्वाचे घटक असतात. हे घटक, किंबहुना या व्यक्ती जीवनातील प्रत्येक वळणावर महत्वाची भूमिका बजावतात. पण, अनेकदा या नात्यांचीही ठराविक मर्यादा असते. त्यामुळं ही मर्यादा वेळेत ओळखणं कधीही फायद्याचं, अन्यथा पश्चातापाचीच वेळ येते. तज्ज्ञांचं असं म्हणणं, की वैवाहिक आणि मैत्रीच्या नात्यामध्ये समतोल राखता आलाच पाहिजे, असं केल्यानंच नात्यांमधील गोडवा टिकवून ठेवता येतो. यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काही गोष्टींबद्दलची गोपनीयता.
वाद - वैवाहिक नात्यात अनेक मुद्द्यावरून मतभेद होतात. पण, हे वाद मित्रांपर्यंत नेणं योग्य नाही. असं केल्यास मित्रपरिवाराला तुमच्या नात्यातील उणिवा लक्षात येऊन त्याबाबत पूर्वग्रह बांधले जातात.
बेडरुम सिक्रेट - वैवाहिक जीवनातील काही गोष्टींची गोपनीयता पाळली जाणं अतिशय महत्त्वाचं. त्यापैकीच एक म्हणजे पती, पत्नीच्या नात्यातील काही अशा गोष्टी ज्यामध्ये त्यांच्या इंटिमसी किंवा तत्सम गोष्टींचा उल्लेख आहे.
सासू- सुनेचे वाद - प्रत्येक घरात वादाला तोंड फोडणारी कारणं असतात. पण, हे वाद कुटुंबाचा उंबरठा ओलांडून बाहेर पडले की आणखी विकोपास जाण्याची आणि टोकाची मतं बनण्याची शक्यता अधिक असते.
आर्थिक स्थिती- लग्नानंतर आर्थिक परिस्थितीमध्ये बरेच बदल होतात. पण, नव्या नात्यामध्ये अनेकदा याच मुद्द्यांवरून खटके उडतात. पण, अशा वेळी त्याविषयी मित्रांकडे वाच्यता न करणं फायद्याचं.
वैद्यकीय गोष्टी- एखादं आजारपण, मानसिक किंवा शारीरिक स्थिती या आणि अशा गोष्टींसमवेत जोडीदारात असणाऱ्या उणिवांची मित्रांमध्ये चर्चा न करणं फायद्याचं.
अनेकदा अडचणीच्या प्रसंगी किंवा गप्पांच्या ओघात अनावधानानं मित्र- मैत्रिणींकडे आपल्याकडून नात्यातील अशा काही गोष्टी सांगितल्या जातात, ज्या प्रत्यक्षात सांगणं अपेक्षित नसतं. त्यामुळं भविष्यात वाद आणि मतभेद होण्याची दाट शक्यता असते. यातून नात्यातही तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळं काही गोष्टी मित्रांना सांगताना जाणीवपूर्वक टाळाव्यात.