श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : राज्यात सर्वत्र शेतकरी संपाचं वारं वाहत असताना यवतमाळ तालुक्यातील 25 हून अधिक गावातील नागरिक गरजे पुरतीच शेती करणार आहेत. कुटुंबाला लागेल एवढंच पिकवून उर्वरित शेती पडिक ठेवण्याचा धाडसी निर्णय या शेतक-यांनी घेतलाय. जाणून घेऊयात लाखांच्या या पोशिंद्यानं का उचललंय असं टोकाचं पाऊल.
जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजावर आज विचित्र वेळ येऊन ठेपलीय. काळ्या मातीतून हिरवं सोनं पिकवणारा शेतकरी संपावर जातोय. तर दुसरीकडे यवतमाळसारख्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील कास्तक-यांनी आता पोटापुरतंच पिकवण्याचा निर्णय घेतलाय. जवळपास 25 गावातील शेतक-यांनी ग्रामसभेत तसा ठरावच पास केलाय.
निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारची चुकीची धोरणं यामुळे शेतकरी हतबल झालाय. पावसाअभावी कधी पिकलंच नाही, तर कधी मालाला भाव न मिळाल्यानं खर्चही निघाला नाही. आता पावसाला सुरुवात झालीय. उधारीवर शेत नांगरुनही ठेवलंय. पण हातात छदाम नाही आणि बॅंकांनी दारात उभं करायलाही नकार दिलाय. अशावेळी करायचं तरी काय, असा प्रश्न या शेतक-यांना सतावतोय.
शेतकरी संपादरम्यान बाजार समित्या ओस पडल्या आणि भाजीपाल्यांचे भाव कडाडले. मात्र, आता या अन्नदात्यानं काही पिकवलंच नाही तर काय होईल याचा विचार न केलेलाच बरा.