गांधीजींच्या पहिल्या दक्षिण आफ्रिका प्रवासाच्या रेल्वे डब्याची प्रतिकृती वर्धा रेल्वे स्थानकात बसवणार

जिल्ह्याच्या सिमारेषेवर नीलपक्षी करणार स्वागत

Updated: Aug 10, 2020, 11:53 AM IST
गांधीजींच्या पहिल्या दक्षिण आफ्रिका प्रवासाच्या रेल्वे डब्याची प्रतिकृती वर्धा रेल्वे स्थानकात बसवणार

वर्धा : गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेला जाताना पहिल्यांदा ज्या रेल्वेडब्यातून प्रवास केला होता, त्या रेल्वेडब्याची प्रतिकृती वर्ध्याच्या रेल्वेस्थानकात लवकरच उभारली जाणार आहे. राज्य सरकार आणि रेल्वे विभागाच्या सहकार्याने ही प्रतिकृती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी तात्काळ सर्व प्रक्रिया पार पाडून 2 ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी सेवाग्राम विकास आढावा बैठकीत दिले.  

तसेच जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यासाठी जिल्ह्याच्या प्रवेश द्वारावर जिल्ह्याची ओळख ठरलेला नीलकंठ पक्षाची भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. 
धामनदीच्या एकाच किनाऱ्यावरील विकासकामे झाली आहे. दुसऱ्या बाजूचेही कामे तात्काळ सुरू करावे.सेवाग्राम वेथील चरखा घरच्या आवारात स्क्रॅप पासून बनविलेले देशात कुठेही पाहायला मिळणार नाहीत असे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे  भव्य शिल्प बसविण्यात येत आहे. हे नाविन्यपूर्ण काम जे जे आर्टच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केले आहे. 

सेवाग्राम विकास आराखड्याच्या निधीतून शहरातील विविध चौकांचे  सौंदर्गीकरण करण्यात आले आहे.सौंदरीकरण झालेल्या कामाचे स्वरूप तसेच कायम राहावे म्हणून  त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी  मोठ्या कंपन्या, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि मोठे शासकीय कार्यालये यांना सोपविण्यात यावी अशी सूचना पालकमंत्री यांनी केली. जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात बैठक घेऊन याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. 
सेवाग्राम आणि पवनार आश्रमाची माहिती इतर जिल्ह्यातून व परदेशातून येणाऱ्या नागरिकांना व्हावी यासाठी नागपूर विमानतळ, रेल्वे स्थानक, वर्धा रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर ऐतिहासीक माहिती देणारे केंद्र उभारण्यात यावे असेही श्री केदार यांनी सांगितले.   

जिल्ह्याच्या प्रत्येक मोठ्या शासकीय कार्यालयात चरख्याची प्रतिकृती बसवा,  धामनदीच्या पात्रात  शोभा वाढविण्याकरीता पाण्याचे मोठे कारजेही उभारण्यात यावे असेही श्री केदार  यांनी सांगितले.  यावेळी अडारकर असोसिएट यांनी आतापर्यंत झालेल्या कामांचे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाग्राम विकास कामा संदर्भात पालकमंत्री सुनील केदार यांनी घेतलेल्या  बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, सेवाग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन. प्रभू,जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, अधीक्षक अभियंता श्री टाके, सामाजिक वनिकरण विभागाचे श्री जोशी, उपअभियंता मंत्री, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.