'कांड्या पेटवायच्या, त्यातून...'; CM शिंदेंची सही असल्याचं ऐकताच खवळले अजित पवार

Ajit Pawar Fumes Over Devendra Fadnavis Letter: प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला असता उपुमख्यमंत्री चांगलेच संतापले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 8, 2023, 12:19 PM IST
'कांड्या पेटवायच्या, त्यातून...'; CM शिंदेंची सही असल्याचं ऐकताच खवळले अजित पवार title=
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत असतानाच घडला हा प्रकार

Ajit Pawar Fumes Over Devendra Fadnavis Letter: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बचे पडसाद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळत आहेत. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट केल्यानंतर फडणवीस यांनी यावर आक्षेप घेतला. नवाब मलिक आजही अजित पवार गटाचे सदस्य बसलेल्या सत्ताधारी आमदारांच्या बाकड्यावर जाऊन बसले.

अजित पवार संतापले

नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेण्यास भारतीय जनता पार्टीचा स्पष्ट विरोध असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लहून कळवलं आहे. हे पत्र राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच या पत्राला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पूर्ण समर्थन होतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीस यांनी एक्सवरुन (ट्वीटरवरुन) पोस्ट केलेल्या पत्राला शिंदेंचा पाठिंबा होता असं म्हणत दुसऱ्या दिवशी अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता ते चांगलेच संतापले.

शिंदेंची पत्रावर सही असल्याचं ऐकलं अन्...

अजित पवार हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस अजित पवार यांनी नवाब मलिक भूमिका स्पष्ट करतील त्यानंतरच आपण बोलू असं सांगितलं. अजित पवारांना प्रश्न विचारताना एका पत्रकाराने, "दादा ते फडणवीसांचं मत आहे तेच शिंदेचं मत आहे," असं म्हणत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकाराला मध्येच थांबवत अजित पवारांनी, "ते तुम्हाला बोलले का?" असा प्रश्न विचारला. त्यावर पत्रकाराने, "त्यांना मडियाशी बोलायचं नाही," असं उत्तर दिलं. "ते असं काही म्हटलेलं नसताना मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की...' असं म्हणत अजित पवार प्रतिक्रिया देत होते तितक्यात एका पत्रकाने फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असल्याचं म्हटलं. हे विधान ऐकून अजित पवार अजूनच संतापले.

नक्की वाचा >> मलिकांवरुन फडणवीस-पवारांमध्ये जुंपली असतानाच CM शिंदेंनी कोणाची बाजू घेतली? म्हणाले, 'पक्ष कसा चालवावा हा..'

कांड्या पेटवायच्या..

अजित पवारांनी थेट त्या पत्रकाराकडे मुख्यमंत्री शिंदेची स्वाक्षरी असलेल्या पत्राची मागणी केली. "बघू दाखव" असं अजित पवार पत्रकाराला म्हणाले. "हेच जे तुमचं चुकतं. काही वाटेल ते.." असं अजित पवार म्हणत असतानाच पत्रकाने 'आहे सही' असं पुन्हा म्हटलं. "आहे सही तर दाखव ना पुरावा. दाखव की. उगच काहीतरी तुम्हाला दिलाय अधिकार म्हणून बोलायचं. काही महिती नाही कुठल्या तरी कांड्या पेटवायच्या, त्याच्यातून कोणाचं तरी ऐकायचं आणि सांगायचं की असं असं आहे. मला दाखव," असं अजित पवार संतापून म्हणाले.