मलिकांवरुन फडणवीस-पवारांमध्ये जुंपली असतानाच CM शिंदे म्हणाले, 'पक्ष कसा चालवावा हा..'

CM Eknath Shinde On Devendra Fadnavis Letter To Ajit Pawar Over Nawab Malik: नवाब मलिक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी पक्षांच्या बाकावर बसले आहेत. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 8, 2023, 11:45 AM IST
मलिकांवरुन फडणवीस-पवारांमध्ये जुंपली असतानाच CM शिंदे म्हणाले, 'पक्ष कसा चालवावा हा..' title=
मुख्यमंत्र्यांनी मांडली आपली भूमिका

CM Eknath Shinde On Devendra Fadnavis Letter To Ajit Pawar Over Nawab Malik: "विरोधी पक्षानेही या विषयावर नाकाने कांदे सोलायची काही गरज नाही. त्यांना तो अधिकार नाही," असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना नवाब मलिक यांच्या उपस्थितीवरुन पाठवलेल्या पत्रासंदर्भात बोलताना लगावला आहे. "माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. सध्या केवळ प्रकृतीच्या कारणावरून ते जामीनावर तुरुंगातून बाहेर आहेत. त्यांना कोर्टाने अद्याप निर्दोष ठरविलेले नाही. त्यामुळे, त्यांच्याविषयीची आमची पूर्वीची भूमिका अजूनही कायम आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सत्ताधारी बाकावर बसणं चुकीचं

नवाब मलिक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी पक्षांच्या बाकावर बसले आहेत. अशापद्धतीने सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसणे योग्य नसल्याचं शिंदे म्हणाले आहेत. "सत्ताधारी पक्षांच्या बाकावरील त्यांची उपस्थिती संकेतांना धरुन नाही," असं शिंदे म्हणाले आहेत.

शिवसेना पूर्णतः सहमत

"आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हा सर्वस्वी त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहित व जनहिताच्या ध्येयाने एकत्र आलेले आहेत. त्यामुळे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे. किंबहुना ही आम्ही परस्पर सहमतीनेच ती भूमिका घेतलेली आहे," असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.

नवाब मालिक तुरुंगात असताना ते..

"जनहिताचा, लोकभावनेचा आदर करून अजितदादा पवार योग्य भूमिका घेतील," अशी अपेक्षा शिंदेंनी व्यक्त केली आहे. "विरोधी पक्षानेही या विषयावर नाकाने कांदे सोलायची काही गरज नाही. त्यांना तो अधिकार नाही. नवाब मालिक तुरुंगात असताना ते महाविकास आघाडीत मंत्रीपदावर होते. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नव्हती. त्यामुळे त्यांना या मुद्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही," असं शिंदे म्हणालेत.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यापासूनच जेलमधून बाहेर आलेले नवाब मलिक नेमक्या कोणत्या बाजूला आपला पाठिंबा देणार याची चर्चा होती. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने या चर्चांना पूर्णविराम मिळाला. नवाब मलिक अधिवेशनसाठी दाखल झाले असता सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. यामुळे त्यांचा अजित पवार गटाला पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं. मात्र यामुळे एक चर्चा बंद झाली असली तरी नवा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीत सहभागी करुन घेण्यावर नाराजी जाहीर केली आहे.