'काहीजण जाणीवपूर्वपणे कमळावर...'; कमळ चिन्हावर लढण्यासंदर्भात अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar On Contesting Upcoming Elections on BJP Lotus Symbol: "बोलताना आणि चर्चा करताना महायुतीमधील मित्रपक्ष नाराज होणार नाही याची काळजी घ्यावी" असा सूचनाही अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 23, 2023, 09:42 AM IST
'काहीजण जाणीवपूर्वपणे कमळावर...'; कमळ चिन्हावर लढण्यासंदर्भात अजित पवारांची प्रतिक्रिया title=
पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केलं हे विधान

Ajit Pawar On Contesting Upcoming Elections on BJP Lotus Symbol: महाराष्ट्राच्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर दावा केला आहे. आगामी निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटालाही कमळ या निवडणूक चिन्हावरच निवडणूक लढावी लागेल असं आव्हाड यांनी म्हटलं. एका कथित बैठकीचा संदर्भ देत आव्हाड यांनी हा दावा केल्याने एकच खळबळ उडाली. असं असतानाच आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दाव्यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

आव्हाड यांनी 20 डिसेंबर रोजी केलेल्या एका एक्स पोस्टमध्ये म्हणजेच ट्वीटमध्ये एक खळबळजनक दावा केला. "नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले," असं आव्हाड म्हणाले.

पुढे याच पोस्टमध्ये, "ज्यांना राजकारण समजते, ज्यांना राजकीय जाण आहे त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी," असं आव्हाड म्हणाले. आपल्या पोस्टच्या शेवटी त्यांनी, "महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही," अशी शक्यता आव्हाड यांनी व्यक्त केली.

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार यांनी आमदार तसेच पदाधिकाऱ्यांबरोबर शुक्रवारी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीदरम्यानच अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या दाव्यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे. "काहीजण जाणीवपूर्वपणे कमळावर लढणार असल्याचं पसरवत आहेत," असं अजित पवार यांनी बैठकीमध्ये नमूद केलं.

नक्की वाचा >> 'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो की...'; पवार कुटुंबाबद्दल पदाधिकाऱ्यांशी बोलताना अजित पवारांचं रोखठोक विधान

तसेच पुढे बोलताना अजित पवार यांनी, "आता येणारी लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे आताच विधानसभेचा विचार करु नका," अशा शब्दांमध्ये पदाधिकाऱ्यांना बजावलं आहे. "बोलताना आणि चर्चा करताना महायुतीमधील मित्रपक्ष नाराज होणार नाही याची काळजी घ्यावी" असा सूचनाही अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.