मुंबई : पुण्यात गुरुवारी दोन दिग्गजांची भेट झाली... एक अभिनेता तर दुसरा नेता .. अभिनेता आमिर खान आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची ही भेट होती. पाणी फाऊंडेशन मार्फत सुरु असलेल्या कामाची माहिती देण्यासाठी आमिर खास पवारांना भेटण्यासाठी आला होता. पुण्यात पवारांचं निवासस्थान असलेल्या मोदीबागेत त्यांची जवळ जवळ २ तास या विषयावर चर्चा झाली. यावेळी पवारांनी आमिरच्या कामाचं कौतुक केलं, तसंच काही सूचनाही केल्या.
विशेष म्हणजे हे सगळं बोलत असताना आमिरचा लगान हा चित्रपट आवडल्याचंही पवारांनी त्याला सांगितलं. पवारांच्या या भेटीनं आमिरही भारावून गेला होता. शरद पवार यांच्या व्यक्तिमत्वाने आपण किती भारावून गेलोय हे सांगणारा संदेश त्यानं पवारांचे मित्र असलेल्या विठ्ठल मणियार यांना पाठवला. शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर याबाबतचा वृत्तांत पोस्ट केलाय. महत्वाचं म्हणजे या भेटीत राजकारणावर कुठल्याच प्रकारची चर्चा झाली नाही असं त्यांनी आवर्जून नमूद केलय.
राज्यात सध्या आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीनं सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला... सांगली जिल्ह्यातील आवंढी गावात त्यांनी गावकऱ्यांसोबत श्रमदान केलं. यावेळी वृद्ध महिला तसेच गावकऱ्यांची त्यांनी आस्थेवाईकपणं चौकशी केली. गावागावात पाण्याचं सिंचन तर होतंय, शिवाय लोकांमध्येही एकी निर्माण होतेय, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, औरंगाबाद दंगलीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं त्यांनी टाळलं...