केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, महाराष्ट्राच्या वाट्याला कोणती खाती?

केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.  

Updated: Jul 7, 2021, 10:55 PM IST
केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, महाराष्ट्राच्या वाट्याला कोणती खाती?

नवी दिल्ली :  राष्ट्रपती भवनात आज (7 जूलै) मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या वेळेस एकूण ४३  जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात ३६ नव्या चेह-यांचा समावेश करण्यात आलाय. महाराष्ट्रातून एकूण 4 नेत्यांचाही मंत्री आणि गोपनियतेची शपथ घेतली दरम्यान मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सर्वांचे लक्ष कोणाला कोणतं खातं मिळणार, याकडे लागले होते. ही प्रतिक्षा अखेर संपली आहे. खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. (Announcing the allocation of the Union Cabinet 2021 Narayan Rane has been given the responsibility of the Msme department) 

राणेंना कोणतं खातं?

महाराष्ट्रातून एकूण 4 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील,  दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ भारती पवार आणि भागवतराव कराड यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. नारायण राणे यांनी कॅबिनेट तर उर्वरित तिघांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता नारायण राणे यांना सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग खातं देण्यात आलंय. 

भागवत कराड यांच्याकडे अर्थ राज्यमंत्रिपद देण्यात आलंय. तर भारती पवारांकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्रिपद सोपवण्यात आलंय. कपिल पाटील यांच्याकडे पंचायतराज राज्यमंत्रिपद दिलंय. 

ज्येष्ठ मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल 

खातेवाटपासह अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना अतिरिक्त पदभार तसेच खात्यांमध्येही बदल करण्यात आलाय. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. शाह यांच्याकडे  नव्या सहकार मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. अमित शाह यांच्याकडे आधीपासून गृह विभागाची जबाबदारी आहे. 

तर पीयूष गोयल यांच्याकडे असलेलं रेल्वेमंत्री पद काढून घेण्यात आलंय. त्याऐवजी त्यांना आता उद्योगमंत्री पद देण्यात आलंय. तर आता अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्री आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलीये.  

हरदीप पुरी यांना पेट्रोलियम विभागाची सूत्र सोपावण्यात आलेली आहे. पुरुषोत्तम रुपाला यांना दुग्ध व मत्स्यव्यवसाय मंत्रालय दिलं गेलंय. तर ज्योतिरादित्य सिंधीया यांना नागरी उड्डाण मंत्री पदाची सांभाळण्याची संधी मिळाली आहे. गिरीराज सिंग यांना ग्रामीण विकास मंत्रीपदाची जबाबदारी तर मीनाक्षी लेखी यांना संस्कृती राज्यमंत्री पद पदरी पडलंय.