परळी, बीड : विधानसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी पंतप्रधान मोदींची पंकजा मुंडेंच्या परळीत जोरदार सभा झाली. या सभेत त्यांनी 'काश्मीरमधून ३७० हटवलं तसा मराठवाड्यातून दुष्काळ हटवणार' असल्याचा नारा दिला. तसंच ३७० बाबत टीका करणाऱ्यांचा मोदींना चांगलाच समाचार घेतला. जनताच काँग्रेस राष्ट्रवादीला धडा शिकवणार असल्याची टीका त्यांनी केली.
सभेपूर्वी मोदींनी वैजनाथाचं दर्शन घेत आरती आणि पूजा केली. यावेळी त्याच्यासोबत पंकजा मुंडेही उपस्थित होत्या.
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंसाठी राष्ट्रीय नेत्यांनी जोरदार मोट बांधल्याचं दिसतंय. राज्यातल्या प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांनी दसऱ्याच्या मुहुर्तावर पंकजा मुंडेंच्या मतदारसंघातून केला. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदीही परळीत दाखल झाले. त्यामुळे पंकजा मुंडे यांना पक्षाच्या ओबीसी चेहरा म्हणून पुढे करण्यात येत आहे का? की त्यांच्यासमोर धनंजय मुंडेंनी कडवं आव्हान उभं केल्यामुळे पंकजांना मोदी-शाहांची गरज भासली आहे? असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत.