'पोट भरलेले पवार १० रुपयांच्या जेवणावर टीका करतात'; उद्धव ठाकरेंचा टोला

महाराष्ट्रात सत्ता आली तर १० रुपयांमध्ये जेवण देणार असल्याची घोषणा शिवसेनेने केली आहे.

Updated: Oct 14, 2019, 01:49 PM IST
'पोट भरलेले पवार १० रुपयांच्या जेवणावर टीका करतात'; उद्धव ठाकरेंचा टोला

उस्मानाबाद : महाराष्ट्रात सत्ता आली तर १० रुपयांमध्ये जेवण देणार असल्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. शरद पवारांनी या मुद्द्यावरून निशाणा साधल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी याला प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार आमच्या १० रुपयांच्या जेवणावर टीका करत आहेत, पण त्यांची पोटं भरली आहेत आणि तुमची पोटं उपाशी आहेत. अन्नामध्ये खड्यासारखे येऊ नका, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

'शरद पवारांनी दुष्काळी भागासाठी काय केलं? चारा छावणी आणि जनतेला पाणी नाही. शरद पवार आता बोंबलत फिरत आहेत. पण यापूर्वी पवारांनी हे का नाही केलं?' असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. बाळासाहेबांना अटक करणं ही चूक झाली, असं शरद पवार म्हणतात मग माफी का मागत नाही? असा प्रश्नही उद्धवनी विचारला.

भाजपला पाठिंबा दिला नसता तर हे सरकार पडलं असतं. सरकार हलतं डुलतं झालं असतं. आमच्यामुळे हे सरकार तरलं. मी सत्तेत असूनही बोलतो. या सरकारच्या चांगल्या कामात शिवसेनेचाही वाटा आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. तसंच दुष्काळाचं चक्र भेदण्यासाठी वॉटर ग्रीड आणणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं. 

उस्मानाबादच्या या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेतल्या नाराजांना उद्धव ठाकरेंनी व्यासपीठावर बोलावलं आणि वितुष्ट संपवण्याचा प्रयत्न केला. बंडखोराला थारा देणार नाही, तसंच पाठीत खंजीर खुपसला तर सोडणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. 

मला सत्ता पाहिजे, पण ती खुर्च्या उबवण्यासाठी नाही, तर राबवण्यासाठी पाहिजे. आताचं राजकारण विचित्र झालं आहे. कोणावर टीका करायची? आज एखाद्या उमेदवारावर सडकून टीका केली तर नंतर तो आमच्याच पक्षात दिसतो, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.