Beed Accident : घाटात कारवरचं नियंत्रण सुटलं आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं

एकाच कुटुंबातील चार पुरुषांचा मृत्यू, आता उरलाय तो फक्त कुटुंबातील महिलांचा आक्रोश

Updated: May 12, 2022, 02:55 PM IST
Beed Accident : घाटात कारवरचं नियंत्रण सुटलं आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं title=

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार पुरुषांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बीडमधल्या धामणगाव घाटात कारचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळ पसरली आहे. 

बीडमधील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील पाच जण पुण्याहून बीडकडे येत होते . धामणगांव घाटात त्यांची क्रेटा गाडी रस्त्याच्या कडेला जावून आदळली . या अपघातात टेकवाणी कुटुंबातील सुनील टेकवाणी , शंकर टेकवाणी , सतीश टेकवाणी यांच्यासह आणखी एकाचा मृत्यु झाला आहे . 

कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला धडकली. हा अपघात इतकी भीषण होता की कारचा अक्षरश चेंदामेंदा झाला. यात कारमधल्या पाच जणांपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला. 

टेकवाणी कुटुंब बीडमधील एक प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंब म्हणून ओळखले जातं . एकाच कुटुंबातील चौघांच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरुन 4 मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातामुळे घाटाताील वाहतूक ठप्प झाली होती.