नाद केला पण वाया गेला..., 2 कोटींची विहीर बांधली, तुंडूब पाण्याने भरली, तरीही शेतात पिकच नाही!

Beed Farmer News: तीन वर्षात तीन पिकं घेतली मात्र सर्व शेती तोट्यात गेली. त्या उलट पदरचे बारा ते पंधरा लाख रुपये खर्च करावे लागले, अशी खंत शेतकऱ्यांने व्यक्त केली आहे.   

Updated: May 21, 2024, 02:12 PM IST
नाद केला पण वाया गेला..., 2 कोटींची विहीर बांधली, तुंडूब पाण्याने भरली, तरीही शेतात पिकच नाही! title=
beed Farmer built Well worth rs 2 crore but no crop in his field

विष्णू बुरगे, झी मीडिया

Beed Farmer News: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातल्या पाडळसिंगी गावातल्या शेतकऱ्याने दोन कोटी रुपये खर्च करून भली मोठी विहीर बांधली. या विहिरीची चर्चा जिल्ह्यासह राज्यभरात झाली मात्र त्या शेतकऱ्याला त्या विहिरीचा किती फायदा झालाय हे चार वर्षानंतर समोर आलं आहे.  हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचं चांगलंच कंबरड मोडलं. त्यामुळे उत्पन्न सोडाच उलट तोटा झाल्याचं शेतकरी सांगतोय पाहूया झी 24 तास स्पेशल रिपोर्ट

बीड मधील गेवराई तालुक्यातल्या पाडळसिंगी येथील मारोतो बजगुडे शेतकऱ्याने लाखो रुपये खर्च करून एक भली मोठी विहीर बांधली. पाडळशिंगीच्या या शेतकऱ्याने बांधलेल्या भल्या मोठ्या विहिरीची जिल्हासह राज्यभरात चर्चा झाली. मात्र लाखो लिटर पाणी क्षमतेची असलेली ही विहीर आणि भर उन्हाळ्यामध्ये पाणी असताना देखील या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये कुठलेही पीक नाही. पिकवलेल्या पिकाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी पाणी असूनही तोट्याची शेती होत असल्याचं सांगत आतापर्यंत अनेक पिकं घेतली मात्र त्यातून कुठलाही फायदा होत नाही. उलट हमीभाव नसल्याने पदरचे पैसे खर्च करावे लागत असल्याची खंत शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

महागाई प्रचंड वाढली आहे. पेरणी, लावणी, खत, पाणी काढणे या सर्वांचा विचार केला तर उत्पन्न सोडा पदरचे पैसे खर्च करावे लागतात त्यामुळे कुठलही पीक परवडत नाही. आतापर्यंत तीन वर्षांमध्ये बारा ते पंधरा लाख रुपये इतर व्यवसायातले आणि हात उसने घेऊन खर्च करण्याची वेळ आल्याचं मारुती बजगुडे यांच्या मुलांना सांगितलं

बजगुडे यांनी ज्या भागांमध्ये ही महाकाय विहीर घेतली. त्या ठिकाणी 10 एकरहून अधिक शेती आहे. मात्र असं असलं तरी मागील तीन वर्षांमध्ये बजगुडे यांच्याकडून या शेतीमध्ये अनेक पिकं घेण्यात आले. मात्र जे जे पिकं घेतली ते पिकं घेतल्यानंतर जे पीक आणि फळबागा पिकवल्या त्या जगल्याच नाहीत. पाणी असताना देखील जे पीक आलं त्याला हमीभावच मिळाला नसल्यामुळे या शेतकऱ्याला वेळोवेळी मनस्ताप सहन करावा लागला. परिणामी आता या शेतकऱ्यानं भली मोठी विहीर त्यामध्ये पाणी असूनही शेती न करण्याचाच निर्णय घेतला आहे. जर शेती पिकं परवडतच नसतील उलट पदरीचे पैसे खर्च करावे लागत असतील तर शेती करावी कशी? असा सवाल हा शेतकरी करतोय त्यामुळे पाणी असूनही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला कोरडवाहू शेती वरचीच पिक घेण्याची वेळ आली असंच म्हणावे लागेल.

दहा एकर शेती पैकी बजगुडे यांच्या शेती वरती आजही दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांची देखील शेती आहे. कुठलही पीक आज त्यांच्या शेतीमध्ये नाही. ज्या ठिकाणी फळबागा लावल्या होत्या त्या ठिकाणी फळबागा म्हणावा अशा आल्या नाहीत परिणामी त्यांनी काही भागातील फळबागा उपटून फेकून दिले आहेत. तर काही भागातील फळबागा वाळून गेले आहेत. तर भली मोठी विहीर झाल्यामुळे ड्रीप स्पिंकलर रेन पाईप शेती अंतर्गत पाईपलाईन केल्या यावर लाखो रुपये खर्च केला. मात्र हे सर्व आता जागेवरच पडून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.