स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा शिक्षकाकडून खून; समोर आलं धक्कादायक कारण

वाचनालयात अभ्यास करत बसलेल्या तरुणावर शिक्षकाने गावठी कट्ट्याने गोळी झाडली

Updated: Sep 3, 2022, 09:20 PM IST
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा शिक्षकाकडून खून; समोर आलं धक्कादायक कारण title=

प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : वाचनालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचा देशी कट्ट्यातून गोळी झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना भंडारा येथे घडली आहे. शहरातील अन्नाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालयात  शनिवारी हा प्रकार घडला. पोलिसांनी घटनास्थाळावरून तासिका तत्वावर शिक्षक असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. देशी कट्ट्याने खून करण्याच्या घटनेने भंडारा शहरात एकच खळबड उडाली. अतुल बाळकृष्ण वंजारी (30) रा. शास्त्री वॉर्ड, गणेशपूर असे मृत तरुणाचे नाव आहे. तर गंगाधर नारायण निखारे (42) रा. पद्मा वॉर्ड असे आरोपीचे नाव आहे.

प्रकल्पग्रस्त असलेला अतुल वंजारी भंडारा शहरातील हेडगेवार चौकातील अन्नाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. शनिवारी दुपारी तो अभ्यास करत असताना त्याठिकाणी गंगाधर निखारे आला आणि त्याने देशी कट्ट्यातून अतुलच्या पाठीवर गोळी झाडली.  काही क्षणातच तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.

त्यानंतर तिथे असलेल्या काही जणांनी आरोपी गंगाधरला पकडून ठेवले आणि या  घटनेची माहिती भंडारा शहर पोलिसांना दिली. भंडारा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुभाष बारसे पथकासह तात्काळ दाखल झाले. जखमी अतुलला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

हत्येचं कारण आलं समोर

गंगाधार निखारे हा उच्च शिक्षित असून तो भंडारा शहरातील एका महाविद्यालयात तासिका तत्वावर भौतिकशास्त्र विषय शिकवित होता. त्यावेळी गंगाधार परिरवारसह अतुल वंजारी यांच्या घरी भाड्याने राहत होता. सध्या तो कोंढा येथील एका महाविद्यायात तासिका तत्वावर कार्यरत आहे. अतुलकडे राहताना त्यांच्यात 2020 पासून वाद सुरू होता. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल होता. मात्र शनिवारी गंगाधर भंडारा येथे एका महाविद्यालयात मुलाखत देण्यासाठी आला. मुलाखत आटोपल्यावर तो अतुल अभ्यास करत असलेल्या वाचनायलात पोहचला आणि त्याने देशी कट्ट्यातून गोळी झाडून अतुलचा खून केला.