अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुणे शहर भाजपच्या नवीन मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. पुणे महापालिका परिसरातच पक्षानं हे नवीन कार्यालय थाटलं आहे. या कार्याक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार घणाघात केला.
पुणे महापालिकेवर पुन्हा भाजपाचा भगवा फडकवणार अशी गर्जना करत पुण्यात शिवसेना नावालाही उरली नाहीए अशी टोला फडणवीस यांनी लगावलाय
येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा महापालिकेवर लागल्याशिवाय राहणार नाही. अलीकडच्या काळात मला भाजपचा भगवा असं सांगावं लागतं. त्याचं कारण म्हणजे भगव्याची शपथ घेणारे ज्यांना भगव्याचा मानही नाही, सन्मानही नाही, हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटते अशा लोकांसोबत मांडीला मांडी लावून जाऊन बसले आहेत. जे लोक रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्यांच्यासोबत गेलेत अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
होय आम्ही हिंदुत्ववादी आहोत, सावरकरांचा, छत्रपती शिवरायांचा आम्हाला अभिमान आहे असं सांगत फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
हे भाजपचे शक्ती प्रदर्शन नाही. कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यकर्ते एकत्र आलेत. शक्ती प्रदर्शन करायचं असतं तर शहरातील एकही मैदान पुरणार नाही, असंही फडणवीस यांनी या कार्यक्रमात म्हटलं.
मविआ सरकारवर घणाघात
महाराष्ट्रात वसुली हा एकमेव धंदा सुरू आहे. नेते आणि नोकरशहा मिळून जिल्हा जिल्ह्यात खंडणी वसुलीचं काम करत आहेत असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.