नाशिकमध्ये नक्की काय चाललेय? जागा बळकावण्यासाठी 'भोंदुगिरीचे दुकान'

जादूटोणा (Black Magic) आणि भुताखेताच्या गोष्टी एकविसाव्या शतकात मागे पडल्यात, असं तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी वाचा...

Updated: Jan 16, 2021, 08:38 PM IST
नाशिकमध्ये नक्की काय चाललेय? जागा बळकावण्यासाठी 'भोंदुगिरीचे दुकान'  title=

योगेश खरे, नाशिक : जादूटोणा (Black Magic) आणि भुताखेताच्या गोष्टी एकविसाव्या शतकात मागे पडल्यात, असं तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी वाचा, धक्कादायक बाब समोर येईल. नाशिक शहरात भर बाजारपेठेत दुकानांसमोर जादूटोणा सुरु आहे. (Black Magic in Nashik) हा उपद्व्याप कशासाठी?

वहिवाटीच्या रस्त्यासाठी चक्क दुकानांवरच 'करणी'
नाशिक शहरातील बाजारपेठेत घडला प्रकार
कोर्टात केस हरल्यानंतर जागामालकाचा जादुटोणा
जादुटोण्याचा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद
 
हे सगळे सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहे. यात दुकानांसमोर मिरची, लिंबू आणि राख फेकणारा हा कुणी भोंदूबाबा नाही. तो आहे जागेचा मालक. दुकानांच्या मागे याची जागा आहे. आपल्या जागेला रस्ता मिळावा यासाठी त्यानं कोर्टात धाव घेतली. पण तिथं केस जिंकता येत नसल्यानं त्याने जादूटोण्याचं हत्यार उपसले. दुकानदारांवर अघोरी जादूटोण्याचे प्रयोग सुरू केलेत. त्यामुळं दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या भीतीपोटी चार दिवस दुकानं बंद ठेवण्यात आली.

या धास्तावलेल्या दुकानदारांच्या मदतीसाठी अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समिती धावून आली. त्यांनी प्रबोधन केल्यानंतर दुकानदारांनी पुन्हा दुकानं उघडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत चित्रीत झाला असून, याप्रकरणी पोलीस तक्रार नोंदवण्यात आली आहे. भद्रकाली पोलीस आता भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाचा शोध घेत आहेत. नाशिकसारख्या महानगरातही जादूटोणा आणि मंत्रतंत्राची भोंदूगिरी सुरू असावी, याचे आश्चर्य वाटते.