रविंद्र कांबळे, सांगली : सांगलीत भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिरंगी लढत होते आहे. विकासाचे मुद्दे, आरोप प्रत्यारोप यावरून सुरू झालेला प्रचाराचा सिलसिला जातीवरही पोहोचला आहे. दुसरीकडे आता उमेदवारांची संपत्ती हाही चर्चेचा विषय बनला आहे. उमेदवारीवरून भाजप आणि काँग्रेस यांच्यातल्या रूसव्या फुगव्यांमुळे सांगली चांगलंच गाजलं. भाजपातल्या नाराजांना गोंजारून नेतृत्वाने पुन्हा संजय पाटील यांना उमेदवारी दिली. हा मतदारसंघच काँग्रेसने मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानीला देऊन टाकला. स्वाभिमानीने इथून विशाल पाटील यांना उमेदवारी दिली. तर बहुजन वंचित आघाडीने धनगर नेते आणि भाजपचे नाराज नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे इथे आता तिरंगी लढत अनुभवायला मिळत आहे.
मतदारसंघात प्रचार करताना विकासाचा मुद्दा मागे पडला आहे. व्यक्तिगत हेवेदावे, आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. जिल्ह्यातल्या सहा तालुक्यातली दुष्काळी स्थिती, अपुऱ्या सिंचन योजना, मोठा उद्योग नसल्याने बेरोजगारी या मुद्द्यांचा उमेदवारांना विसर पडल्याचं दिसतं आहे.
विकासाऐवजी गुंडगिरी आणि जातीची गणितं मांडायला नेत्यांनी सुरूवात केली आहे. अनुसुचित जाती, जमाती, मुस्लीम, धनगर, ओबीसी, ख्रिश्चन मतांसाठी बहुजन वंचित आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्सीखेच करत आहे. दुसरीकडे भाजपाची व्होट बँक म्हणून ब्राह्मण, हिंदुत्ववादी, धनगर समाज, मारवाडी आणि व्यापारी यांच्यासह मराठा समाजाच्या मतांसाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे उमेदवारांची संपत्ती हाही चर्चेचा विषय बनला आहे.
संजय पाटील यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता २०.३९ कोटी रूपये इतकी आहे. पाटील यांनी स्वतःच्या नावे १ कोटी १७ लाखांचं कर्ज दाखवलं आहे. तर गेल्या ५ वर्षात त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीत दुप्पटीने वाढ झाली आहे. स्वाभिमानीच्या विशाल पाटील यांची संपत्ती सुमारे २१ कोटी रूपये इतकी आहे. त्यांच्यावर १० कोटींची विविध कर्ज आहेत.
तर बहुजन वंचितचे गोपीचंद पडळकर यांची संपत्ती १ कोटी ३ लाख रूपये इतकी आहे. पडळकर यांनी ४२ हजार रूपये कर्ज घेतलं आहे. गुंडगिरीची भाषा, आरोप प्रत्यारोप, जातीची समीकरणं या मुद्द्यांवर सांगलीत निवडणूक लढली जातेय. मात्र प्रत्यक्ष मतदाराला अपेक्षित विकासाबाबत बोलायला कोणीही तयार नाही. त्यामुळे मतदार राजा आता कोणाला दणका देणार हे लवकरच कळेल.