मुंबई : मागील २२ महिने जेलमध्ये असलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आज मंगळवारी देशभर तहसिल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता निदर्शने केली जाणार आहेत.
छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीकडून चौकशीच्या नावाखाली नाहक कारागृहात डांबून ठेवले असल्याचा भुजबळ समर्थकांचा आरोप आहे. त्यांच्यावर न्यायालयामध्ये अद्यापही कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. मात्र गेल्या २२ महिन्यांपासून शासनाच्या चौकशी यंत्रणेने केवळ चौकशीच्या नावाखाली त्यांना कारागृहात डांबून ठेवले आहे.
वास्तविक भुजबळांकडून न्यायालयीन चौकशीला संपूर्णपणे सहकार्य केले जात असतांना सरकारकडून मात्र सूडबुद्धीने कारवाई सुरु असल्याचा आरोप भुजबळ समर्थकांकडून करण्यात येत आहे. याचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने केली जाणार आहेत.