सातारा : बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करतानाच बंगळूरची उन्नती शहाजीराजे यांच्यामुळे झाली, याची तरी जाण ठेवा, अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे. खासदार संभाजी महाराज यांनी ट्विटद्वारे हा संताप व्यक्त केला आहे.
संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बंगळूरची उन्नती हि शहाजीराजे यांच्यामुळे झाली, याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दाखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडाचा निषेध करतानाच रस्त्यावरच्या आणि न्यायालयातील दोन्ही लढ्यात विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही असा इशारा शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे दिला.
मराठी जनतेवर अन्याय करून आपण यशस्वी होऊ असा जर कर्नाटक सरकारचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवप्रेमींमागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे.
कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगण्यासाठी तेथे अधिवेशनाचा घाट घातला आहे त्याचा निषेध. बंगळूरमधील त्या गुन्हेगाराला तातडीने अटक करावी, तसेच अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाचे स्तोम थांबवावे अशी मागणीही शिंदे यांनी केली.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. कोल्हापूरसह सांगली, मिरज येथे संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटकचे फलक असलेले सर्व व्यवसाय बंद पाडले आहेत. तर, मिरजेत कर्नाटकच्या गाड्या फोडण्यात आल्या. या घटनेमुळे तणावाचे वातावरण बनले आहे.पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.