तीन दिवसांवर लग्न, पाहुणे आले, लगबग सुरु होती... पण अंगाला हळद लागण्याआधीच मुलीचा मृत्यू

लाडक्या लेकीचं लग्न असल्याने घरात आनंदाचं वातावरण होतं, लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, पण हळद लागण्याच्या आदल्या दिवशीच  होणाऱ्या वधूचा मृत्यू झाला. ज्या घरातून मुलीची पाठवणी होणार होती, पण तिला कायमचा निरोप देण्याची वेळ आली.

Updated: Mar 24, 2023, 06:33 PM IST
तीन दिवसांवर लग्न, पाहुणे आले, लगबग सुरु होती... पण अंगाला हळद लागण्याआधीच मुलीचा मृत्यू

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : तीन दिवसानं लग्न, पत्रिका वाटल्या, बस्ता बांधला, पाहुणे आणी लग्नाची लगबग सुरु असतानाच अघटीत घडलं आणि लग्नघरात शोककळ पसरली. ज्या घरातून मुलीची पाठवणी होणार होती, त्याच घरातून मुलीला कायमचा निरोप देण्याची वेळ तिच्या कुटुंबियांवर आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

काय आहे नेमकी घटना?
छत्रपती संभाजीनगरमधल्या (SambhajiNagar) सिल्लोड (Sillod) तालुक्यातील वांगी खुर्द इथं राहणाऱ्या जाधव कुटुंबामधल्या रोहिणी उर्फ पल्लवी भगवान जाधव यांच्या मुलीचं लग्न (Wedding) ठरलं होतं. येत्या 26 मार्चला तिचं लग्न होतं. यासाठी घरात लगबग सुरु होती. सर्व पाहुण्यांना लग्नाची पत्रिका वाटून झाल्या होत्या.  लग्नाचा बस्ता, मंडप, वाजंत्री जेवणाची व्यवस्था पूर्ण झाली होती, जवळचे पाहुणे घरी येण्यास सुरुवात झाली होती. 24 मार्चला हळदीचा कार्यक्रम होता. पल्लवीचा आनंदही गगनात मावत नव्हता. पण हळदीच्या आदल्या दिवशी अघटीत घडलं.

गुरुवारी सकाळी पल्लवी आंघोळीसाटी बाथरुमध्ये गेली, आंघोळीसाठी गरम पाणी काढण्यासाठी तीने हिटर सुरु केला, आणि अचानक तिला जोराचा विजेचा शॉक (Electric Shock) लागला. यात पल्लवीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

ओपन जीममध्ये शॉक लागून तरुणाचा मृत्यू
दोन दिवसांपूर्वीच ओपन जीममध्ये व्यायाम करताना एका तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली होती. पुण्यातील उजव्या भुसारी कॉलनीत राहणारा अमोल शंकर नाकते हा तरुण नेहमीप्रमाणे संध्याकाळी व्यायाम करण्यासाठी ओपन जीममध्ये गेला. व्यायाम करत असताना त्याला कोणाचा तरी फोन आला म्हणून तो फोनवर बोलत होता. पण बोलता बोलता तो अचानक खाली कोसळला. व्यायाम करणाऱ्या इतर मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. पण त्याआधीच अमोलचा मृत्यू झाल होता. 

पाऊस पडल्याने जमीन ओली झाली होती, त्यातच जमिनीखालून वीज प्रवाह सुरु असल्याने त्याचा शॉक अमोलला बसला आणि तो जागीच कोसळला. अमोलच्या पायातून विजेचा प्रवाह वाहिल्याने त्याच्या पायाची बोटं काळी-निळी पडली होती. अमोलला वीजेचा जोरदार धक्का बसला होता.