मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर बापाने स्वतःला संपवलं; पैशाअभावी लेकीचे उपचार न झाल्याने टोकाचा निर्णय

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांनीही आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर आणून ठेवल्याने तणाव वाढला आहे.

विशाल करोळे | Updated: Apr 8, 2024, 04:27 PM IST
मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर बापाने स्वतःला संपवलं; पैशाअभावी लेकीचे उपचार न झाल्याने टोकाचा निर्णय title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच वडिलांनीही आत्महत्या केल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह नगरपंचायतीसमोर आणून ठेवत तिथेच अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत मृतदेह हटवणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

दीपक राऊत असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी सोयगाव नगरपंचायतमध्ये पाणीपुरवठा कर्मचारी दीपक राऊत यांना तीन महिन्यापूर्वी कुठलीच सूचना न देता निलंबित केले होते. त्यांचे वेतनही रोखून ठेवण्यात आले होते. त्यातच मृत दीपक राऊत यांच्या 19 वर्षीय मुलीवर पैशाअभावी उपचार न झाल्याने तिचा रविवारी मृत्यू झाला. मुलीचा पैशाअभावी मृत्यू झाल्याने तसेच योग्य वेळी उपचारासाठी पैसा उपलब्ध करू न शकल्यामुळे दीपक राऊत हे हतबल झाले होते. मुलीवर उपचार करु शकलो नाही या भावनेमुळे दीपक राऊत यांना मनस्ताप झाला होता.

हा सगळा प्रकार सहन न झाल्याने मुलीवर अंत्ययसंस्कार केल्यानंतर दीपक राऊत यांनी रात्री 2 वाजता घरात गळपास घेऊन आत्महत्या केली असा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर कुटूंबीय आणि नातेवाईकांनी आक्रोश करत दीपक राऊत यांचा मृतदेह नगरपंचायतीसमोर आणून ठेवला. जो पर्यत दीपक राऊत यांना न्याय मिळत नाही आणि संबंधित नगर पंचायत मुख्यधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यत मृतदेह उचलणार नसल्याची आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. या घटनेनंतर नगरपंचायतची कुठलेही कर्मचारी अधिकारी हजर नाहीत. जर कर्मचारी आणि अधिकारी लवकर हजर नाही झाले नाहीत तर नगरपंचायती समोरच अंत्यसंस्कार करू अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. दुसरीकडे काही तासांतच बाप लेकीच्या एकापाठोपाठ मृत्यूने तालुका हळहळला आहे.

पतीच्या अपघाती निधनानंतर पत्नीने घेतला गळफास

पतीच्या अपघातानंतर दुःख सहन न करू शकणाऱ्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि एका सुखी संसाराचा दुर्दैवी अंत झाला. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बेंद्री या गावातील 30 वर्षीय अरुण बेंद्रिकर हे महावितरण मध्ये कर्मचारी (लाईनमन) होते. नांदेड शहरा जवळील विष्णुपुरी येथे त्यांची ड्यूटी होती. शनिवारी रात्री ड्यूटी आटोपून आपल्या गावी बेंद्री ला जाण्यासाठी ते आपल्या दुचाकीवर निघाले. रात्री 9 च्या सुमारास कहाळा ते गडगा रस्त्यावर मंजरम जवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटना कळाल्यानंतर रात्रीच त्यांची पत्नी स्नेहा आणि कुटुंबीयांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात धाव घेतली. पण अरुण यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना कळाले. पत्नी स्नेहाला नातेवाईकांनी गावी घरी पाठवून दिले. रात्री घराबाहेर अनेक नातेवाईक असताना स्नेहा मुलीला दूध पाजवून येते असे सांगून गेल्या आणि त्यांनी घरात गळफास घेतला. नातेवाईकांनी काही कळेपर्यंत मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीने आत्महत्या केली. या घटनेने नांदेड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.