Ragging In Ghati Hospital: महाराष्ट्रात रॅगिंगविरोधात कठोर कायदा केला असला तरी अद्यापही काही महाविद्यालयात रॅगिंगच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रॅगिंगचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याप्रकरणी घाटी रुग्णालयातील तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. त्याचबरोबर त्यांना 25 हजार रुपये दंड ठोठावल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय म्हणजेच घाटीच्या एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील सहा विद्यार्थी द्वितीय वर्षातील सहा विद्यार्थ्यांना चहा, कॉफी, नाष्टा सिगारेट आणायला सांगून सतत त्रास देत होते. हा प्रकार गेल्या ३ महिन्यांपासून सुरू होता. शनिवारी रात्री द्वितीय वर्षातील एका विद्यार्थ्याने तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचे काम ऐकले नाही. त्यामुळे त्यातील एका विद्यार्थ्याने त्याची कॉलर पकडली आणि शिवीगाळ केली. या प्रकारामुळे चिडलेल्या विद्यार्थ्याने वडिलांना ही माहिती कळवली.
विद्यार्थ्याच्या वडिलांनी रुग्णालय प्रशासन आणि अँटी रॅगिंग कमिटीकडे यासंदर्भात तक्रार केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कमिटीने तातडीने बैठक घेऊन तक्रारीनुसार चौकशी केली. या चौकशीअंती रॅगिंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. समितीच्या अहवालानंतर अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी याप्रकरणी नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या (एनएमसी) नियमानुसार कारवाई केली आहे. घाटी रुग्णालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात रॅगिंगच्या घटना अजूनही घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारने या प्रकरणी ठोस भूमिका घेऊन दोषी विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. घाटी रुग्णालयातील हा प्रकार गंभीर असल्याचेही बोलले जात आहे.