कोरोनाचे संकट । नरेंद्र महाराज ट्रस्टकडून ५० लाखांची मुख्यमंत्री सहाय्य निधीला मदत

राज्यात कोरोना विषाणूचे संकट वाढत आहे. राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे.  

Updated: Apr 2, 2020, 11:29 AM IST
कोरोनाचे संकट । नरेंद्र महाराज ट्रस्टकडून ५० लाखांची मुख्यमंत्री सहाय्य निधीला मदत title=
छाया - अमोल खटावकर

रत्नागिरी : राज्यात कोरोना विषाणूचे संकट वाढत आहे. राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. नाणीज येथील नरेंद्र महाराज संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहाय्य निधीला ५० लाखांची मदत करण्यात आली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे ५० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

जगद्गुरु नरेंद्रचार्य संस्थानने कोरोनाविरोधात लढ्यासाठी पुढाकार घेत आणि सामाजिक  बांधिलकी जपत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी ५० लाख रुपयांचे निधी मदत म्हणून दिला आहे. याआधी नरेंद्र महाराज संस्थानतर्फे नैसर्गिक आपत्तीसाठीही मदत केली आहे. दुष्काळग्रस्तांसाठी, भूंकप पीडित लोकांसाठी मदत केली आहे. आता राज्यात कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मदत केली आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात आलेल्या पुरात अनेकांचे संसार उद्धवस्त  झालेत. तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी संस्थानने ११०० टन चाऱ्याचे वाटप केले. तसेच शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

आता देशात तसेच राज्यात कोरोनाचे सावट मोठे आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्मयंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ही मदत केल्याचे नरेंद्र महाराज संस्थानच्यावतीने सांगण्यात आले. पन्नास लाखांच्या निधीचा धनादेश  जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी राजन बोडेकर यांनी संपूर्द केला. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, रत्नागिरी पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी पुरुषोत्तम सुर्वे उपस्थित होते.