Nagpur News : नववीत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीने व्हिडीओ पाहून घरातच प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात (Nagpur Crime) समोर आला आहे. या मुलीची वर्षभरापूर्वी इंन्स्टाग्रामवरून (Instagram) एका तरुणासोबत मैत्री झाली होती. याचाच फायदा घेत तरुणाने तिच्यावर अतिप्रसंग केला होता. यातून 15 वर्षीय मुलगी गर्भवती (pregnant) झाली होती. घडलेला सर्व प्रकार घरात कोणाला कळू नये म्हणून मुलीने घरातच प्रसुती केली. मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बेल्टने दाबला नवजात बाळाचा गळा
इयत्ता नववीत शिकणारी मुलगी गरोदर राहिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. इन्स्टाग्रामवर तिच्याशी चॅट करणाऱ्या एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 15 वर्षांच्या या गर्भवती मुलीने YouTube व्हिडिओ स्वतःच शुक्रवारी घरी एकटी असताना तिच्या स्वतःच्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर शेजारच्यांना बाळाच्या रडण्याच्या आवाज जाऊ नये म्हणून मुलीने तिच्या बाळाचा बेल्टने गळा दाबला. त्यानंतर बाळाचा मृतदेह पिशवीत टाकून टेरेसवर टाकून दिले. मात्र संध्याकाळी मुलीची आई घरी आल्यावर प्रकृती खराब असल्यानं तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पीडित मुलीने आईला घटनाक्रम सांगितला. दुसरीकडे पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून इन्स्ट्राग्राम आयडीवरून मिळलेल्या नावावर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अज्ञात व्यक्तीसोबत ओळख पडली महागात
ही मुलगी तिच्या फोनवर बराच वेळ घालवायची. काही महिन्यांपूर्वी तिची इंस्टाग्रामवर एका ठाकूर नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. त्यानंतर दोघेही चॅट करु लागले. मुलीला त्याचे पूर्ण नाव किंवा पत्ता माहित नव्हता. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही ती त्याच्याबद्दल कोणतीही माहिती देऊ शकली नाही. ठाकूर नेहमी तिच्याशी मेसेंजर आणि व्हॉईस कॉलद्वारे बोलायचा. त्यामुळे ठाकूरचा शोध घेण्यासाठी त्याचा मोबाइल नंबर देखील पोलिसांकडे उपलब्ध नाही.
घरात रक्ताचे डाग पाहून आईला बसला धक्का
हे प्रकरण तेव्हा तापलं जेव्हा अनोळखी व्यक्तीसोबत मुलगी चॅट करत असल्याचे पाहून आईला राग अनावर झाला. काही आठवड्यांपूर्वी अल्पवयीन मुलीच्या आईने तिचा मोबाईल फोडला. त्यानंतर मुलीने तिच्या आईचा मोबाईल वापरायला सुरुवात केली. पकडले जाऊ नये म्हणून मुलगी ब्राउझिंग हिस्ट्री डिलीट करायची. शुक्रवारी रात्री, मॉलमध्ये काम करणारी मुलीची आई परतली तेव्हा तिला घरात रक्ताचे डाग पाहून धक्का बसला. तिला मुलगीही थकलेली दिसत होती. मासिक पाळीमुळे रक्ताचे डाग पडल्याच असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीने आईची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर तिने सगळी हकीकत सांगून टाकली.
दारु पाजून केला अत्याचार
हा सर्व प्रकार ऐकून मुलीच्या आईने तिला घेऊन मेओ रुग्णालय गाठले. रुग्णालयातल्या डॉक्टरांनी अंबाझरी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर अंबाझरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिच्याकडे चौकशी केली. ठाकूरने भेटण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला बाहेर बोलवले होते. त्यानंतर ठाकूर तिला एका मैत्रिणीच्या ठिकाणी घेऊन गेला. त्यानंतर त्याने अल्पवयीन मुलीला दारू पिण्यास भाग पाडल्यानंतर तिच्यावर जबरदस्ती केली होती.
धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा जेव्हा तिची आई तिच्या मासिक पाळीबद्दल विचारायची तेव्हा अल्पवयीन मुलगी तिच्या आईला दाखवण्यासाठी नेहमी सॅनिटरी नॅपकिनच्या पिशव्या तयार ठेवत असे. काही शेजाऱ्यांनी अल्पवयीन मुलीला पोट फुगल्याबद्दल विचारले तेव्हा तिने मासिक पाळी येत असल्याचा दावा केला होता.
"या प्रकरणातील अनेक प्रश्नांबाबत खुलासा झालेला नाही. आमच्याकडे अल्पवयीन आणि तिच्या आईची प्राथमिक माहिती आहे. पण याबाबत तपशीलवार चौकशी आवश्यक आहे," असे अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर म्हणाले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात बलात्काराचा आणि गर्भाच्या अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे.