तब्बल ४० वर्षांनंतर झाली आई-मुलीची भेट, पण...

स्वीडनमधील एका मुलीला तब्बल चाळीस वर्षांनंतर तिला तिची आई मिळालीय. तेही तिची आई शेवटच्या घटका मोजत असताना... अशा अवस्थेत आई आणि तिच्या लेकीची झालेली भेट पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

Updated: Jun 13, 2017, 04:15 PM IST
तब्बल ४० वर्षांनंतर झाली आई-मुलीची भेट, पण...  title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : स्वीडनमधील एका मुलीला तब्बल चाळीस वर्षांनंतर तिला तिची आई मिळालीय. तेही तिची आई शेवटच्या घटका मोजत असताना... अशा अवस्थेत आई आणि तिच्या लेकीची झालेली भेट पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

ही माय लेकीची भेट आहे तब्बल चाळीस वर्षांनंतरची... यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थॅलेसिमिया या दुर्धर आजारावर उपचार घेत असलेल्या एका आईला तिची लेक भेटलीय. स्वीडनमध्ये वास्तव्यास असलेल्या निलाक्षी एलिझाबेथ या मुलीने तिच्या आईचा शोध घेतलाय. २७ वर्षांनंतरच्या शोधानंतर तिला तिची आई मिळालीय. या भेटीनंतर दोघींनाही अश्रु अनावर झाले.

...अशी झाली ताटातूट!

पतीच्या आत्महत्येनंतर निलाक्षीच्या आईला तिच्या माहेरच्यांनी पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये ठेवलं. तिथे तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. अडीच वर्षांनंतर स्वीडनच्या एका दाम्पत्यानं निलाक्षीला दत्तक घेतलं आणि निलाक्षी एलिझाबेथ झाली. निलाक्षी १३ वर्षांची झाल्यावर तिला कळलं की ती स्वीडीश नसून एक भारतीय आहे. त्यानंतर सुरु झाला एक शोध...

निलाक्षीही थॅलेसिमिया या आजारानं ग्रस्त आहे... यासाठी तिला तिची नोकरीही सोडावी लागली... स्वीडनध्ये तिच्यावर उपचार सुरु आहे. तिला आईजवळ थांबायची खूप इच्छा आहे... मात्र, ते शक्य नसल्यानं ती आईच्या उपचारासाठी स्वीडनमधून पैसे पाठवतेय. आईला दीर्घायुष्य लाभावं यासाठी धडपडतेय.