बनावट नोटा बँकेत जमा करण्याचा नवा फंडा, लाखो रूपयांच्या बनावट नोटा जप्त

बँकेत नोटा तपासण्याची यंत्रणा असतानाही एवढी मोठी रक्कम डिपॉझिट झालीच कशी, असा सवाल विचारला जात आहे  

Updated: Aug 13, 2021, 09:23 PM IST
बनावट नोटा बँकेत जमा करण्याचा नवा फंडा, लाखो रूपयांच्या बनावट नोटा जप्त title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : तुमच्याकडे असलेल्या नोटा खोट्या तर नाहीत ना हे एकदा तपासून बघा. कारण बनावट नोटा छापून चलनात आणणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे या टोळीनं मोठ्या शिताफीनं बँकेतही बनावट नोटा जमा केल्या आहेत. 

बाजारात खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी बनावट नोटांचा वापर केला जातो. पण वस्त्रउद्योगनगरी इचलकरंजीत भामट्यांनी चक्क बँकेतूनच बनावट नोटा डिपॉझिट केल्या. या नोटा एक दोन लाखांच्या नाहीतर तर तब्बल 10 लाख रूपये किंमतीच्या आहेत. पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीची पाळंमुळं कर्नाटक आणि इतर राज्यातही पोहचल्याचं समोर येतं आहे. 

पोलिसांनी बनावट नोटा, प्रिंटर, स्कॅनर असा तब्बल 11 लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. 

इचलकरांजीतल्या एका बँकेच्या कॅश डिपॉझिटमध्ये 10 लाखांच्या बनावट नोटा आढळून आल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झालाय. या प्रकरणात पोलिसांनी आंबाजी सुळेकर आणि राजूभाई लवंगे अशा दोघांना अटक केलीय. त्यांच्याकडून 2000, 500, 200, 100 आणि 50 रूपयांच्या 10 लाख 54 हजारांच्या नोटा जप्त केल्या आहेत. 

भामट्यांना पोलिसांनी अटक केली असली तरी बँकेच्या यंत्रणेबाबत मात्र सवाल उपस्थित होत आहे. बँकेत नोटा तपासण्याची यंत्रणा असतानाही तिथं एवढी मोठी रक्कम डिपॉझिट झालीच कशी? आतापर्यंत बाजारात अशा बनावट नोटांचा सुळसुळाट सुरू होता. मात्र आता या नोटा बँकेतही डिपॉझिट होऊ लागल्या आहेत. त्यामुळे नोटांच्या बाबतीत विश्वास तरी कुणावर ठेवायचा? हा एक मोठा प्रश्न आहे.