Devendra Fadnavis On Sandeep Kshirsagar : बीड शहरात 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या जाळपोळीच्या घटनेची (Beed arson incident) एसआयटी मार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडताना केली होती. मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली. घराच्या गेट बाहेर पोलिसांची गाडी उभी होती पण काहीच केले नाही. या घटनेचा मराठा आंदोलनाशी संबंध नाही. रेकॉर्ड काढला तर यातील मास्टर माईंड समोर येईल, असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं होतं. त्यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत उत्तर देताना मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
बीडमध्ये हिंसक जमावाने बहुतेक सर्व राजकीय पक्षांना लक्ष्य केलं. अशा घटनाकडे राजकारणाच्या पलिकडे जाऊन पाहिले पाहिजे, अन्यथा राज्यात कायदा-सुव्यवस्था कधीच राहणार नाही. एकूण 278 आरोपींना अटक झाली. त्यातील 30 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आलीय. माजलगाव घटनेतील 40 आरोपी फरार असून बीड घटनेतील 61 गुन्हेगार फरार आहेत. या आरोपींची कसून चौकशी होते आहे. मोबाईल लोकेशन, एकमेकांना पाठविलेले एसएमएस आदी सर्व पाहिले जात आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
एक बाब अतिशय स्पष्ट की, ज्यांच्याविरोधात पुरावे सापडले, त्यांनाच अटक करण्यात आली आहे. माजलगावमध्ये सुमारे 5000 चा जमाव होता तर बीडमध्ये 1500 चा. हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित होता का, हेही पोलिस तपासत आहेत. फरार आरोपींना अटक झाली की मास्टरमाईंडपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. याप्रकरणी SIT चौकशीची मागणी झाली. पण पोलिस प्रमुखांशी चर्चा केली, तेव्हा तपास योग्य गतीने पुढे गेला असल्याने त्याबाबत त्यांनी तशी गरज नसल्याचे सांगितले. पण सभागृहातील सदस्यांची इच्छा असेल तर 2 दिवसात एसआयटी गठीत करू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं आहे.
बीडमध्ये हिंसक जमावाने बहुतेक सर्व राजकीय पक्षांना लक्ष्य केले. अशा घटनाकडे राजकारणाच्या पलिकडे जाऊन पाहिले पाहिजे, अन्यथा राज्यात कायदा-सुव्यवस्था कधीच राहणार नाही.
एकूण 278 आरोपींना अटक. त्यातील 30 सराईत गुन्हेगार.
माजलगाव घटनेतील 40 आरोपी फरार असून बीड घटनेतील 61 गुन्हेगार… pic.twitter.com/QvzUcNznbp— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 15, 2023
दरम्यान, या घटनेत पक्ष, जात, धर्म काहीही न पाहता दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. यात मागे हटण्याची गरज नाही. कुणाची चूक नसेल आणि अटक झाली असेल, तर त्याला मी स्वतः बाहेर काढण्यासाठी मदत करेन, असंही देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर देताना म्हटलं आहे.