लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. यादरम्यान आतापासूनच नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुलढाण्यातील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. मोदी नव्हे तर औरंगजेब म्हणा असं ते जाहीरपणे म्हणाले आहेत. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं असता त्यांनी उपहासात्मकपणे उत्तर दिलं.
"या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. जे महाराष्ट्रावर आज चाल करून येत आहेत ते, गुजरातचे राज्यकर्ते मोदी अथवा शाह असतील. महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तिथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येतेय आणि शिवसेनेच्या विरोधात, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात," अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. यापुढे मोदी नव्हे तर औरंगजेब म्हणा असंही ते म्हणाले आहेत.
संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाशी केल्याबद्दल विचारलं असता देवेंद्र फडणवीसांनी उपहासात्मकपणे उत्तर दिलं. संजय राऊत कोण आहेत? संजय राऊतांसारख्या माणसाबद्दल तुम्ही मला प्रतिक्रिया विचारत आहात. माझी काही तरी प्रतिमा ठेवा असं ते म्हणाले.
"अमरावतीची जागा भाजपा लढेल. जो उमेदवार असेल तो भाजपाच्या चिन्हावरच लढेल. नवनीत राणा विद्यमान खासदार आहेत. पाच वर्ष त्या भाजपासह राहिल्या आहेत. लोकसभेत त्यांनी ताकदीने भाजपा आणि पंतप्रधान मोदींची बाजू मांडली आहे. अखेर अंतिम निर्णय संसदीय समिती किंवा निवडणूक समिती घेते. त्यावर अधिक भाष्य करु शकत नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पुढे त्यांनी सांगितलं की, "भाजपाच्या वतीने ज्या उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाली आहे, तेथील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मी आणि चंद्रशेखर बावनकुळे दौरा करत आहोत. आज आम्ही अकोल्यात असून, उद्या वर्ध्याला जाणार आहोत. आम्ही सगळ्या मतदारसंघात जाणार आहोत. जाहीर प्रचाराच्या आधी सर्व प्लॅनिंग करत आहोत. तसंच काही अडचणी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न आहे".