'अजित पवारांना मुख्यमंत्री बनवू', फडणवीसांचं विधान! शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, '6 महिन्यात...'

Devendra Fadnavis On Making Ajit Pawar Chief Minister: अजित पवार गट मे महिन्यामध्ये शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यापासूनच त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे. त्यातच आता फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 5, 2023, 10:41 AM IST
'अजित पवारांना मुख्यमंत्री बनवू', फडणवीसांचं विधान! शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, '6 महिन्यात...' title=
फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये केलं हे विधान

Devendra Fadnavis On Making Ajit Pawar Chief Minister: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण देताना भाजपाच राज्यातील दादा पक्ष असेल असं म्हटलं होतं. यानंतर आता फडणवीस यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. भाजपा अजित पवारांना योग्य वेळ येईल तेव्हा पूर्ण 5 वर्षांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्री बनवणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. अजित पवारांकडून 6 महिन्यांसाठी राज्याचं नेतृत्व सोपवण्याची मागणी केली जाते यासंदर्भात 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावरच उत्तर देताना फडणवीस यांनी हे विधान केलं आहे.

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून चर्चा

मे महिन्याच्या सुरुवातीलाच अजित पवार राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये आपल्या 9 आमदारांसहीत मंत्रीपदाची शपथ घेऊन सहभागी झाले. तेव्हापासूनच म्हणजेच मागील 4 महिन्यांपासूनच अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा भाजपाचा विचार आहे असं अगदी विरोधकांनाही म्हटलं. यासंदर्भात राजकीय वर्तुळामध्ये तुफान चर्चा झाली. मात्र आता अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे यावेळेस त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचंही उल्लेख केला.

अजित पवार म्हणालेले फक्त 6 महिने द्या...

राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांनी पहिल्यांदाच उघडपणे अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात अशाप्रकारे सार्वजनिकरित्या विधान केलं आहे. या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यासंदर्भात प्रश्न विचारला गेला. "अनेकजण असं म्हणतात की अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. अनेकदा ते सांगतात की 6 महिने मला द्या. मी मुख्यमंत्री होऊन सर्व गोष्टी बदलून दाखवतो. अशाप्रकारचं काही आश्वासन त्यांना देण्यात आलं आहे का?" असं फडणवीस यांना विचारण्यात आलं.

5 वर्षांसाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करणार

"पहिली गोष्ट म्हणजे 6 महिन्यात काही गोष्टी बदल नाहीत. बनवलं तर त्यांना (अजित पवारांना'') पूर्ण 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू," असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यावर मुलाखतकाराने "तुम्ही अजित पवारांना 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवाणार असं म्हणत आहात का?" असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस यांनी, "जेव्हा संधी मिळेत तेव्हा... आता तरी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत," असं उत्तर दिलं.

एकनाथ शिंदेंचाही केला उल्लेख

पुढे बोलताना फडणवीस यांनी, "लोकसभेची निवडणूक असो, विधानसभेची निवडणूक असो एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवल्या जातात. तुम्ही हे डोक्यातून काढून टाका की महाराष्ट्रामध्ये सध्या मुख्यमंत्री बदलले जाणार आहेत. मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत," असंही म्हटलं आहे.