Devendra Fadnavis Vs Shinde Group: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील नेते रामदास कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना समज देण्याची मागणी केली आहे. 'भाजपाने आमचा केसाने गळा कापू नये,' असंही रामदास कदम म्हणाले असून या विधानामुळे महायुतीमधील शिंदे गट आणि भाजपामधील धुसपूस चव्हाट्यावर आली आहे. याच शाब्दिक वादाचा पुढील अंक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिलेल्या उत्तराने लिहिला गेला आहे.
रामदास कदम यांनी भाजपासंदर्भात उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाला भाजपाचे 105 आमदार असल्याची आठवण करुन दिली आहे. 105 आमदार असूनही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याचा उल्लेख फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला. "मी इतके वर्ष रामदासभाईंना ओळखतो. अशाप्रकारचे स्टेटमेंट करणे आणि टोकाची विधानं करण्याची त्यांची सवय आहे. कधीकधी रागाने देखील ते बोलतात. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा समान्मानच केला आहे. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही 105 आहोत. तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदेंना आम्ही मुख्यमंत्री केलं. यामागील कारण म्हणजे खरी शिवसेना आमच्यासोबत आल्याचं आम्हाला समाधान आहे," असं फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी थेट संख्याबळाचा उल्लेख करत शिंदे गटाला सुनावल्यानंतर शिंदे गटानेही या विधानावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडताना शिंदेंनी उठाव केल्यानेच भाजपा सत्तेत असल्याचं विसरता येणार नाही अशा शब्दांमध्ये जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला महाराष्ट्रातील सत्ता शिंदेंमुळे मिळाल्याचं अधोरेखित केलं आहे. "त्यांचे (भाजपाचे) 105 आमदार आहेत हे निश्चित आहे. त्यांच्यामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हे ही निश्चित आहे. मात्र हे ही तितकच खरं आहे की एकनाथ शिंदेंनीच उठाव केला नसता तर 105 जरी असते तरी त्यांना विरोधातच बसावं लागलं असतं. ते शिंदेंमुळे सत्तेत आले आहेत. दोन्ही बाजूंनी पाहिलं तर ते शिंदेंमुळे ते सत्तेत आहेत आणि त्यांच्यामुळे शिंदे सत्तेत आहेत. त्यामुळेच कोणी कोणाचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करु नये," असं शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'नितीनजी 'मविआ'कडून लढा' म्हणणाऱ्या ठाकरेंना फडणवीस म्हणाले, 'गल्लीतल्या व्यक्तीने..'
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून आपल्या मुलाला मुद्दाम जाणीवपूर्वकपणे त्रास दिला जातोय असा आरोप रामदास कदमांनी केला आहे. रवींद्र चव्हाण हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. चव्हाणांच्या विषयावरुनच बोलताना रामदास कदमांनी भाजपा नेत्यांना थेट, 'भाजपाने केसाने गळा कापू नये,' असा इशारा दिला आहे. 'माझं नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा,' असं सूचक विधान करत त्यांनी भाजपा नेत्यांना वरिष्ठांनी समज द्यावी असं म्हटलं आहे.