लांजा येथील ग्रामीण रुग्णालयाचे विदारक वास्तव उघड

मोडक्या गंजलेल्या खिडक्या, वाढलेलं गवत, मोकाट जनावरं, एक्स रे, सोनोग्राफी मशिनचा अभाव हे विदारक वास्तव आहे लांजा ग्रामीण रुग्णालयाचं. रत्नागिरीतील लांजा तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाची भीषण दुरावस्था असल्याचे समोर आले आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Jan 11, 2018, 12:55 PM IST
लांजा येथील ग्रामीण रुग्णालयाचे विदारक वास्तव उघड  title=

प्रविण दाभोळकर, झी मीडिया लांजा : मोडक्या गंजलेल्या खिडक्या, वाढलेलं गवत, मोकाट जनावरं, एक्स रे, सोनोग्राफी मशिनचा अभाव हे विदारक वास्तव आहे लांजा ग्रामीण रुग्णालयाचं. रत्नागिरीतील लांजा तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाची भीषण दुरावस्था असल्याचे समोर आले आहे. 

वारंवार तक्रार होऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने रुग्णांवर मनस्तापाची वेळ आली आहे. दरम्यान, स्वाभिमान संघटनेने यासंदर्भात व्हिडिओ जारी करुन या दुरावस्थेला वाचा फोडली आहे.  मुंबई गोवा हायवेवरील मध्यवर्ती ठिकाण असल्याने याला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

१२३ गावातील लांजा तालुक्यात ६२ ग्रामपंचायती असून साधारण १ लाख १३ हजार १५३ इतकी लोकसंख्या आहे. इथल्या एकुलत्या एक ग्रामीण रुग्णालयातही चांगल्या सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना उपचारासाठी थेट रत्नागिरी शहरात  जावे लागते.

अपुऱ्या सोनोग्राफी मशिन, अपुरे बेड तसेच सीझरसाठी आवश्यक भूलतज्ञही इथे उपलब्ध नसल्याचे 'स्वाभिमान' च्या व्हिडिओतून समोर आणले आहे. रक्त तपासणी केंद्राचीही दुरावस्था यातून समोर आली आहे. 

एकाच महिलेची प्रसुती 

या रुग्णालयातील प्रसुतीगृहात एकाच महिलेची प्रसुती होत असल्याचे  या व्हिडिओतून समोर आणण्यात आले आहे. दुसरी बाळंतीण आल्यास तिने कुठे जायच ? असा सवाल देखील यातून विचारण्यात आला आहे.

अस्वच्छ परिसर 

एकीकडे स्वच्छ भारत मिशनची दवंडी पिटवली जात असताना या रुग्णालयाचा परीसर, स्वच्छातागृह, कर्मचाऱ्यांचे वसतीगृह यांच्याकडे दुर्लक्षच झाल्याचे समोर आले आहे. 

एक्स रे तज्ञ नाही 

 प्राथमिक उपचार, अपघात, आजारपण यासाठी आलेल्या रुग्णांना या ठिकाणी एक्स रे तज्ञ नसल्याचे हा विभाग बंद असल्याचे  समजते. 

ऑपरेशन थिएटरवर धुळीचं साम्राज्य

ऑपरेशन थिएटर ज्या ठिकाणी स्वच्छता असणं गरजेच आहे, तिथे धुळीचे साम्राज्य असल्याचे वास्तवरही या व्हिडिओतून समोर आणण्यात आले आहे. 

स्वाभिमान पक्षातर्फे यासाठी नुकतेच एक आंदोलन पुकारण्यात आले होते. जनतेचा आक्रोश पाहता आता तरी आरोग्य विभागाला जाग येणार का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.