वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : शिवसेनेतील (Shivsena) फुटीनंतर 40 आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी भाजपसोबत (BJP) युती करत राज्यात सरकार स्थापन केलं आहे. मात्र मंत्री पदाच्या वाटपासूनच शिंदे गटात वाद सुरु असल्याची चर्चा सुरुवातीपासून आहे. त्यानंतर आता शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिंदे गटातील मंत्र्याने एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांची साथ दिलेल्या आमदाराला डावलल्याने वादाची ठिणगी पडली आहे. या आमदाराने शिंदेच्या मंत्र्यावर चांगलेच तोंडसुख घेतल्याचे पाहायला मिळालं आहे. (Dispute between MLA Chimanrao Patil and Minister Gulabrao Patil from Shinde group)
शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) व आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मुलाच्या गटात पाणीपुरवठ्याचे कामे दिल्याने या दोघांमध्ये संघर्ष वाढला आहे. मंत्री झाला म्हणून सरकार तुमची खाजगी मालमत्ता नाही. सरकार आले म्हणून तुम्ही मंत्री आहात याचे भान ठेवा असे तोंडसुख आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटलांवर घेतले आहे. त्यामुळे आपल्याच गटातील आमदार व मंत्र्यांचा संघर्ष एकनाथ शिंदे कसा थांबवणार हे पाहणं आता महत्त्वाचा ठरणार आहे .
मला डावलण्याचा त्यांचा काय संबंध?
"एका सरकारमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते बनवण्यात प्रत्येकाचा वाटा असतो. एकेक मतावर सरकार येत आणि कोसळतं. त्यामुळ कोणी मंत्री झाला तर सरकार त्याची खासगी मालमत्ता नसते. सर्व मिळून सरकार आलेलं असतं आणि म्हणून तुम्ही मंत्री आहात याचं भान कायम ठेवलं पाहिजे. माझ्यावर अन्याय झाल्यानंतर मी एकनाथ शिंदे यांना फोन केला. त्यांनी फोनवर यापुढे असं व्हायला नको असं सांगितलं. मला डावलण्याचा त्यांचा काय संबंध? ते डावलतात हे एकदम चुकीचे आहे," असा रोष चिमणराव पाटील यांनी व्यक्त केला.