Mhada Housing Scheme : मुंबईत घरांचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. यामुळे मुंबईत घर खरेदी करणे आता सर्वसामाम्यांच्या बजेट बाहेर गेले आहे. मुंबईत आपलं हक्काचं घर असावे असावं अशी स्वप्न पाहणाऱ्यांना दिलासा मिळतो तो म्हाडामुळे. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा सर्वसामान्यांना परवडतील असा दरात घरं उपलब्ध करुन देते. म्हाडाच्या लॉटरीत अनेक जण आपले नशिब आजमवतात. अनेकांचे घराचे स्वप्न म्हाडाच्या लॉटरीमुळे पूर्ण होते. घरांच्या विक्रीसह आता मुंबईत म्हाडची घरं भाडे तत्वावर मिळणार आहेत. म्हाडाच्या या निर्णयामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.
येत्या पाच वर्षांत मुंबईत 2.50 लाख नवीन घरे बांधण्याची घोषणा म्हाडाने केली आहे. परवडणाऱ्या घरांच्या किमती 30 टक्क्यांनी कमी करण्याच्या निर्णय देखील म्हाडा घेण्याची शक्यता आहे. यासह म्हाडाची घरे भाडे तत्वार देण्याचा मोठा निर्णय म्हाडाने घेतला आहे.
केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या वतीनं मुंबई महानगर प्रदेशाची गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब म्हणून निवड करण्यात आली आहे. या भागात 2030 पर्यंत म्हणजेच पुढील पाच वर्षांमध्ये या भागात सुमारे 30 लाखांहून अधिक घरांची उभारणी करण्याचा मानस बाळगण्यात आला आहे. यातील सुमारे 8 लाख घरांच्या उभारणीची जबाबदारी म्हाडानं घेतली आहे.
मुंबईत म्हाडा 3 हजार हेक्टर जमीनवर गृहनिर्माण प्रकल्प उभारणार आहे. मुंबई परिसरातील 114 विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींचा पुनर्विकास प्रकल्प देखील म्हाडा राबवणार आहे. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर घर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. विविध योजनांच्या माध्यमातून म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत पुढील पाच वर्षांत 2.50 लाख घरे उपलब्ध होणार आहेत. काही महिन्यांपूर्वी म्हाडाची 2,030 घरांसाठी लॉटरी जाहीर झाली होती. 1.29 लाख लोकांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. 2023 मध्ये म्हाडाच्या 4,082 घरांच्या लॉटरीसाठी 1.09 लाख अर्ज प्राप्त झाले होते.
म्हाडाची घरं भाड्याने मिळणार
विविध कारणांमुळे तसेच कादपत्रांची पूर्तता न झाल्यास अनेकांना म्हाडाचे घरं खरेदी करता येत नाही. मुंबईत स्वत:चे घर नसलेले तसेच शिक्षणासाठी आणि कामानिमित्ताने मुंबईत राहणाऱ्यांना भाड्याने घर घेऊन रहावे लागते. अशा लोकांना म्हाडाच्या एका निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईत भाड्याने घरे उपल्बध करुन देण्याची तयारी म्हाडा करत आहे. म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांनी याबाबत माहिती दिली. मुंबईत नोकरीसाठी तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरी करणाऱ्या महिलांना म्हाडाची घरं भाड्याने दिली जाणार आहेत.