मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही अनेक दशकं पक्षासाठी काम केलं आहे, त्यामुळे संधी मागणं हा आमचा अधिकार आहे. चंद्रकांत पाटील यांना भाजपचा इतिहास माहिती नसावा, असा टोलाही खडसे यांनी 'झी २४ तास'शी बोलताना लगावला.
'भाजपच्या तिकीटावर फक्त मी आणि माझी सून हे दोघंच उभे होतो. आता तर मी पण नाही. आमच्या घरात महानंदाचं पद मिळालं, ते सहकारामधलं पद आहे. भाजपचा तिकडे दुरान्वयेही संबंध नाही. ४० वर्ष आम्ही मेहनत केली. डिपॉझिट जात होतं तिकडे आम्ही तिकीटं घेतली. आमच्या मेहनतीमुळे पक्ष उभा राहिला,' असं खडसे म्हणाले.
'लोकसभेवेळी गोपीचंद पडळकर यांनी हार्दिक पटेल यांना बोलवून मोदींना शिव्या घातल्या. आमच्या मेहनतीचं फळ आम्हाला भाजपने दिलं. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आम्हाला मिळालं,' अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली.
'चंद्रकांतदादांना भाजपचा इतिहास माहिती नसावा, त्यामुळे ते बोलले असतील. मंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला, त्याआधी भाजपशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी चांगलं काम केलं, पण ते भाजपमध्ये सक्रीय झाले नव्हते. मंत्री झाले मग अध्यक्ष झाले तेव्हा भाजप त्यांना माहिती झाली. विद्यार्थी परिषदेमध्ये चंद्रकांतदादांचं फार योगदान आहे, पण भाजपमध्ये नाही, त्यामुळे त्यांनी भाजपचा पूर्वइतिहास तपासून घ्यावा,' असा टोला खडसेंनी हाणला.
विधानपरिषदेचं तिकीट न मिळाल्यामुळे खडसेंनी भाजपच्या राज्यातल्या नेतृत्वावर टीका केली होती. यानंतर झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी खडसेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं.
'नाथाभाऊंना ७ वेळा विधानसभेचं तिकीट दिलं. दोनवेळा मंत्री केलं, विरोधीपक्षनेता केलं. मुलीला तिकीट दिलं. सुनेला तिकीट दिलं. हरीभाऊ जावळे विद्यमान खासदार होते, त्यामुळे त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. जावळेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतरही त्यांचं तिकीट नाकारून खडसेंच्या सुनेला लोकसभेचं तिकीट दिलं. मुलीला जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्ष केलं. खडसेंच्या पत्नीला महानंदाचं अध्यक्षपद दिलं. आणखी किती द्यायचं? पक्षात काम करायचं म्हणजे फक्त आमदार होणं आहे का? असा विचार केंद्रातल्या नेत्यांनी केला असेल,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले.