पराभव झाला तरी पंकजा मुंडे खासदार बनणार आणि त्यांना मंत्रीपदही मिळणार? पण हे सगळ कसं होणार?

पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांची वर्णी राज्यसभेत लागणार अशी चर्चा रंगलेय. त्यातच आता त्यांना मंत्रीपद द्यावे अशी देखील केली जात आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 24, 2024, 11:53 PM IST
पराभव झाला तरी पंकजा मुंडे खासदार बनणार आणि त्यांना मंत्रीपदही मिळणार? पण हे सगळ कसं होणार?  title=

Pankaja Munde :  पराभव झाला तरी पंकजा मुंडे खासदार बनणार आणि त्यांना मंत्रीपदही मिळणार अशी चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांची वर्णी राज्यसभेत लागणार अशी चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे पंकजा मुंडे यांना मंत्रीपद द्यावे अशीही मागणी केली जात आहे. 

बीड जिल्ह्यातील सानपवाडी गावाने एक मुखी ठराव करत पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची मागणी केलीय. पराभवानंतर अनेकवेळा पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत येतं मात्र त्यांना कोणतही मंत्रीपद मिळत नसल्यानं त्यांना संधी द्यावी अशी या गावक-यांची मागणी आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंचं पुनर्वसन झाल्याशिवाय भाजपला मतदान करणार नसल्याची भूमिका या गावक-यांनी घेतली आहे. 

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा निसटता पराभव झाला.. मात्र या पराभवानंतर मराठवाड्यासह महाराष्ट्रातला ओबीसी समाज दुखावल्याची चर्चा आहे.. त्यामुळेच आता पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दिल्लीत झालेल्या बैठकीतही पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची चर्चा झाल्याची माहिती आहे.. राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटलाय.. त्याचमुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घ्या असा सूर राज्यातल्या काही नेत्यांचा आहे.. केंद्रीय नेतृत्त्वाला तशी विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

दरम्यान,  पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या जिव्हारी लागला.. या पराभवानंतर काही जणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. महाराष्ट्रात राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आल्यानं त्यांची जागा रिक्त आहे.  पीयूष गोयल यांचीही जागा रिक्त झाली आहे. उदयनराजे भोसले हे सातारा मतदारसंघातून निवडून आल्यानं ती जागाही रिक्त आहे. तिन्ही जागा भाजपच्या आहेत, मात्र एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जाऊ शकते.

दुसरीकडे एकनाथ खडसेंनीही काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची सून तसंच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही उपस्थित होत्या. या भेटीमुळे गेल्या काही महिन्यांपासून भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणा-या एकनाथ खडसेंचा स्वगृही परतण्याचा मुहूर्त ठरल्याचा दावा केला जातोय. 

राज्यसभा तसंच विधानपरिषद मागणार नाही, विधानसभा लढवणार नाही मात्र पक्षानं संधी दिल्यास ग्रामपंचायत निवडणूक देखील लढवेल असं स्पष्ट मत माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलंय. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा महाराष्ट्रभर चिंतन बैठकीचं आयोजन करत आहेत याच अनुषंगाने रावसाहेब दानवे हे संपूर्ण मराठवाड्यात फिरून कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठक घेत आहेत.