राजकारण जोरात, बळीराजा संकटात! शेतकऱ्यांचा वाली कोण? धक्कादायक वास्तव समोर

राज्यात राजकारणाचा चिखल झालाय, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटतेय. राज्यात राजकारण टीपेला पोहचलेलं असताना शेतक-यांकडे मात्र सरकारचं सपशेल दुर्लक्ष होतंय हेच समोर आलंय.. 

विशाल करोळे | Updated: Jul 7, 2023, 08:24 PM IST
राजकारण जोरात, बळीराजा संकटात! शेतकऱ्यांचा वाली कोण? धक्कादायक वास्तव समोर title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : एकीकडे राज्याच्या राजकीय पटलावर शहकाटशहाचं राजकारण रंगतंय. रोज एखादा राजकीय भूकंप होतोय. मात्र या राजकारणाच्या नादात राज्य सरकार गरीब शेतकऱ्याकडे (Farmers) दुर्लक्ष करतंय का असा सवाल उपस्थित होतोय. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारं अनुदान (Grant) जानेवारीपासून रखडल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. निधीची घोषणा मोठ्या थाटामाटात झाली. मात्र निधीच उपलब्ध झालेला नाही. अनुदानासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही, तो तातडीने द्यावा असं पत्र संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाने मदत आणि पुनर्वसन विभागाला लिहिलंय. डिसेंबर महिन्यात विभागीय आयुक्तालयातून हे पत्र पाठवण्यात आलं. 2022 मध्ये आत्महत्या झालेल्या एकूण 309 लोकांना मदत करण्यासाठी हा निधी मागण्यात आला होता. मात्र निधी उपलब्ध झाला नाहीच,  यावर्षी मे महिन्याच्या अखेरपर्यंत एकट्या मराठवाड्यात (Marathwada) 391 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात..

शेतकरी आत्महत्या थांबणार कधी?
बीड-98, धाराशिव-80, नांदेड-64, संभाजीनगर-50, परभणी-32, लातूर-28, जालना-25, हिंगोली-13 

अनुदानासाठीचा पात्र-अपात्रतेचा मुद्दा बाजूला ठेवला तरी मोठ्या संख्येनं आत्महत्याग्रस्तांची कुटुंबं मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र बेरजेच्या राजकारणात गुंतलेले दिसतायेत. त्यामुळे बळीराजाला कुणीच वाली नाही का? हा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झालाय.  

विदर्भ कोरडाठाक

दुसरीकडे, पूर्व विदर्भाकडे वरुणराजानं पाठ फिरवल्याचं चित्र आहे.. जुलै महिन्याच्या पहिला आठवडा संपायला आला असतानाही अद्यापही विदर्भात दमदार पाऊस झालेला नाहीये. त्यामुळे इथल्या शेतक-यांची चिंता वाढलीये..
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार बॅटिंग केली असली तरी पूर्व विदर्भात मात्र परिस्थिती चिंताजनक आहे.. जुलैचे सात दिवस लोटूनही पूर्व विदर्भात मोठा पाऊसच झालेला नाही. सरासरी पावसाच्या तुलनेत पूर्व विदर्भातील यंदा 47% पावसाची घट असल्याच हवामान विभागाच्या आकडेवारीतून पुढे येतेय. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार या आठवड्यातील अहवालानुसार 1 जुलै ते 7 जुलै पर्यंत 218.2 मिलिमीटर पावसाची नोंद अपेक्षित होती.... पण प्रत्यक्षात 115.8 mm पावसात झाला असल्याने यंदा पूर्व विदर्भात पावसाची तूट दिसून येत आहे... त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही दमदार पावसाची वाट पाहत आहे...

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात जवळपास 74 टक्के कपाशीची तर 64 टक्क्यांच्या घरात सोयाबीनच्या पेरा झालाय. पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यात भाताची लागवड झालीय. मात्र पाऊसच नसल्यानं दुबार पेरणीचं संकट उभं राहतं की काय या चिंतेत शेतकरी आहे..