चांगली बातमी । नागपूरमधील पहिला कोरोना रुग्ण ठणठणीत, दिला डिस्चार्ज

 नागपूरमधून एक चांगली बातमी हाती आली आहे. पहिला कोरोना बाधित रुग्ण ठणठणीत झाला आहे. 

Updated: Mar 26, 2020, 10:36 PM IST
चांगली बातमी । नागपूरमधील पहिला कोरोना रुग्ण ठणठणीत, दिला डिस्चार्ज title=
संग्रहित छाया

नागपूर : राज्यात कोरोना व्हायरच्या ढगांचे सावट असताना नागपूरमधून एक चांगली बातमी हाती आली आहे. पहिला कोरोना बाधित रुग्ण ठणठणीत झाला आहे. त्याच्यावर करण्यात आलेल्या उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुळे कोणीही घाबरुन जावू नये, फक्त स्वत:ची काळजी घ्या आणि लॉकडाऊन काळात घरीच राहणे पसंत करा, असे आवाहन करण्यात येत आहे. तुम्ही स्वत:चा जीव धोक्यात घालू नका आणि दुसऱ्याच्याही जीवाला धोका पोहोचवू नका, अशी साथ घालण्यात येत आहे.

नागपुरात आढळून आलेल्या पहिल्या कोरोना संक्रमित रुग्णाला आज दुपारी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर हा रुग्ण ठणठणीत होवून घरी पोहोचला. ५ मार्चला अमेरिकेतून नागपुरात आल्यानंतर या रुग्णाला कोरोनाचे लक्षण दिसून आले होते. त्यानंतर ११ मार्चला या रुग्णाला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सतत सुधारणा होत होती. त्याचे पुढचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. नियमाप्रमाणे आता त्याला १४दिवस त्याला घरात राहावे लागणार आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतच चालला आहे. राज्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२५ झाली आहे. मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, राज्यात आज एकूण २६९ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.