'कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येचा तपास एसआयटीकडून काढून घ्या'

या हत्येला चार वर्ष उलटूनही संशयितांना ताब्यात घेण्यापलीकडे तपासात फारशी प्रगती झालेली नाही.

Updated: Oct 14, 2019, 03:48 PM IST
'कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येचा तपास एसआयटीकडून काढून घ्या' title=

कोल्हापूर: कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाची सूत्रे विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) काढून घेण्यात यावीत, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली. कोल्हापूर सत्र न्यायालयात सोमवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी पानसरे कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांच्याकडून न्यायालयात यासंदर्भात युक्तिवाद करण्यात आला. 

कॉ. पानसरे यांच्या हत्येला चार वर्षे पूर्ण झाली तरी तपास अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे हत्येचा तपास एसआयटीकडून काढून घ्यावा, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली. यावर न्यायालयाने पानसरे कुटुंबीयांनी लिखित स्वरूपात तशी मागणी करण्याचे आदेश दिले. 

कोल्हापूर येथे फेब्रुवारी २०१५ मध्ये कॉ. गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र, या हत्येला चार वर्ष उलटूनही संशयितांना ताब्यात घेण्यापलीकडे तपासात फारशी प्रगती झालेली नाही. न्यायालयाने एसआयटीच्या तपासावर अनेकदा नाराजीही व्यक्त केली होती. 

सध्या श्रीपती काकडे या हे पानसरे हत्याप्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. ते कोल्हापूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहेत.

दरम्यान, आजच्या सुनावणीदरम्यान एसआयटीने गेल्या काही दिवसांत या प्रकरणाचा फारसा तपास होऊ न शकल्याचे सांगितले. कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे पथकातील अनेक अधिकारी बचावकार्यात व्यग्र होते. मात्र, तरीही डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कलबुर्गी हत्याप्रकरणातील आरोपींचा ताबा मिळवून त्यांच्याकडून पानसरे हत्याकांडातील सूत्रधारांची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.