बाळासाहेबांनी अशी लाथ घातली असती की, अमित शहा मुंबईत आलेच नसते- छगन भुजबळ

तुम्ही चहा विकायचात तर आम्ही काय करु?

Updated: Jan 10, 2019, 07:22 PM IST
बाळासाहेबांनी अशी लाथ घातली असती की, अमित शहा मुंबईत आलेच नसते- छगन भुजबळ

महाड: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी गुरुवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर खोचक टीका केली. ते गुरुवारी राष्ट्रावादी काँग्रेसच्या महाड येथील परिवर्तन यात्रेत बोलत होते. यावेळी त्यांनी शहा यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेसंदर्भात भाष्य केले. काही दिवसांपूर्वी लातूर येथे झालेल्या जाहीर सभेत अमित शहा यांनी युतीसाठी शिवसेनेसमोर फार नमते घेणार नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी 'युती होगी तो ठीक, नहीं तो पटक देंगे', अशा स्पष्ट शब्दांत शिवसेनेला इशारा दिला होता. याच वक्तव्यावरून छगन भुजबळ यांनी अमित शहांची खिल्ली उडविली. अमित शाह यांनी 'पटक देंगे' म्हटल्यावर बाळासाहेबांनी अशी लाथ मारली असती, की ते मुंबईत परत आले नसते, असे भुजबळ यांनी म्हटले. भुजबळांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच हशा पिकला.

...नाही तर शिवसेनेला 'पटक देंगे', अमित शाहंचे स्वबळाचे संकेत

यावेळी त्यांनी सतत आपण चहावाला आहोत, असे सांगून सहानुभूती मिळवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. तुम्ही चहा विकायचात तर आम्ही काय करु? मी पण भाजी विकायचो. तुम्ही चहा विकायचात की अजून काही त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आम्हाला केवळ विकास हवा आहे, असे भुजबळ यांनी म्हटले. तसेच यांची डिग्री फेल, लग्न फेल, घर फेल, चाय फेल, गुजरात मॉडेल फेल, नोटाबंदी फेल, मेक इन इंडिया फेल आणि आता राफेल, असे सांगत त्यांनी नरेंद्र मोदींची खिल्ली उडविली. 

अमित शाह यांच्या स्वबळाच्या इशाऱ्यावर शिवसेनेचं मौन