नांदेड : नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीवर शाळेतील २ शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेला २ महिने उलटले असून पीडित मुलीची प्रकृती बिघडल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकरनगर येथील एका नामांकित शाळेत मुलगी इयत्ता ७वीमध्ये शिकते. २ महिन्यांपूर्वी आरोपी शिक्षक रसूल सय्यद आणि दयानंद राजुळे यांनी मुलीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्हिडिओ दाखवतो म्हणून शाळेतील एका खोलीत नेले. मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर दोघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणाची तक्रार पीडितेच्या आईने शाळा प्रशासनाकडे केली होती. पण विधवा असलेल्या मातेला दबाव टाकून परत पाठवण्यात आले.
बदनामीच्या भीतीने आई गप्प बसली. परंतु काही दिवसांपासून मुलीची प्रकृती बिघडली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत माहिती मिळाल्यावर ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांनी आवाज उठवला आणि त्यानंतर रामतीर्थ पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती न देणाऱ्या प्राचार्य, मुख्याध्यापक आणि अन्य एका महिलेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीची तब्येत हलाखीची असून तिला मानसिक धक्का बसला आहे. दरम्यान शाळा एका बड्या राजकीय नेत्याची असल्याने पोलीस योग्य तपास करत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
राज्यात मुलींनी शाळेत जावं की नाही अशा घटना गेल्या दोन दिवसांत उघडकीस आल्या आहेत. नुकतंच, औरंगाबादमध्ये गतीमंद मुलीचा स्कूलबसचालक आणि त्याच्या साथीदारांनी विनयभंग केल्याची घटना समोर आली होती. मुलींसाठी शाळेत जाणं किती असुरक्षित झालंय हे सांगण्यासाठी या दोन घटना पुरेशा आहेत. शाळेत विद्यार्थिनींचा लैंगिक छळ होऊ नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्यात. तरीही नांदेडमध्ये ही घटना घडली आहे. स्कूलबस चालकांसाठी कठोर नियमावली तयार केलेली असतानाही स्कूलबस चालकांकडून विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ होतोय. त्यामुळे सरकार आणि शाळांनी आणखी नियम कठोर करण्याची गरज निर्माण झाली आहे.