Badave Community: माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजुबाजूला असलेल्या बडव्यांसोबत आहे, असे राजकीय नेत्यांच्या भाषणात आपण ऐकले असेल. एखादा नेता राजकीय पक्ष सोडत असताना या वाक्याचा हमखास उल्लेख करताना दिसतो. अर्थात त्यांचा रोख हा केवळ त्यांच्या राजकीय समस्येकडे असतो. पण वारंवार अशी वाक्य कानी पडू लागल्याने बडवे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. अशा राजकारण्यांविरोधात बडवे समाज कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.
या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील बडवे समाजानं राजकीय नेत्यांचा निषेध नोंदवलाय. राजकीय नेत्यांकडून विशेषतः बंडखोऱी करणाऱ्या नेत्यांकडून आपल्या नेत्याच्या बाजूनं बडव्यांचा घेराव पडलाय अशा शब्दांत त्यांची भूमिका मांडली जाते त्यामुळे यापुढे जर बडव्यांबद्दल चुकीच्या पद्धतीनं उल्लेख केला तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावे लागेल असा इशारा पंढरपूरमधील बडवे समाजानं दिलाय.
आम्ही ब्राम्हण असल्यामुळे आम्हाला टार्गेट केलं जातं. बडवे म्हणजे चोर, दरोडेखोर नाहीत. बडवे हे सहिष्णू लोक आहेत. ज्यांनी हजारो वर्षे विठ्ठलाची सेवा केली. विठ्ठलाचं विठ्ठलपण जपलं, मंदिर जपलं, अशी प्रतिक्रिया बडवे समाजातील सदस्यांनी दिली.
राजकीय व्यक्ती स्वत:च्या स्वार्थासाठी, स्वत:ची पोळी भाजण्यासाठी बडव्यांचं नाव घेतात. त्यामुळे आज आमची मुलं बाळ आणि आया बहिणी यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याची खंत आणखी एक सदस्याने व्यक्त केली.