मिलिंद नार्वेकर म्हणजे आताचे शिवसेनाप्रमुख का? नारायण राणे यांचा खोचक टोला

मिलिंद नार्वेकर यांच्या 'त्या' ट्विटचं फडणवीस यांच्याकडून समर्थन, तर राणेंकडून खिल्ली

Updated: Dec 6, 2021, 03:03 PM IST
मिलिंद नार्वेकर म्हणजे आताचे शिवसेनाप्रमुख का? नारायण राणे यांचा खोचक टोला

पुणे : बाबरी मशिद विद्ध्वंस प्रकरणाला आज 29 वर्ष पूर्ण झाली. 6 डिसेंबर 1992 रोजी कार सेवकांनी बाबरी मशिदीचा विद्धव्ंस केला होता. यानिमित्ताने शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्विट करत या घटनेची आठवण करुन दिली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी एक फोटो शेअर करत त्यात म्हटलंय, अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी बलिदान केलेल्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन.

मिलिंद नार्वेकर यांनी केलेलं हे ट्विट चांगलंच चर्चेत आहे. या ट्विटवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पुण्यात सिंबॉयसिस संस्थेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मिलिंद नार्वेकर यांच्या ट्विटबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांचं बरोबर आहे, त्यात चुकीचं काय? असं वक्तव्य केलं. 

पण तेवढ्यात नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांना थांबवत, मिलंद नार्वेकर कोण आताचे नविन आहेत का शिवसेनाप्रमुख? असा टोला लगावला. नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.