प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूर (kolhapur) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बनावट नोटा (Fake Currency) छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या टोळीबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. टोळीतील मुख्य म्होरक्याने स्वतःच्या डोक्यावरचे कर्ज (Loan) कमी करण्यासाठी बनावट नोटा छापल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नुकत्याच झालेला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये (gram panchayat election) देखील या बनावट नोटांचा वापर झाल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला आहे.
कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोल्हापूर गगनबावडा मार्गावर असणाऱ्या मरळी फाट्यावर सापळा रचून बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी यामध्ये चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून कॉम्प्युटर, प्रिंटर व इतर साहित्य तसेच क्रेटा कार आणि मोबाईल फोन असा 12 लाख 62 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नकली नोटा सापडल्याने पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.
कशी केली अटक?
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पांढऱ्या रंगाची ह्युंडाई कंपनीची एमएच-09-डीएक्स-8888 ही क्रेटा कार बनावट नोटा घेऊन कळे-कोल्हापूर रोडने येणार असल्याची बातमी मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मरळी फाट्यावर सापळा रचत क्रेटा गाडीची झडती घेतली. त्यावेळी संशयित आरोपी चंद्रशेखर बाळासाहेब पाटील, अभिजीत राजेंद्र पवार, दिग्विजय कृष्णात पाटील यांच्याकडे बनावट नोटा आढळल्या. त्यानंतर पोलिसानी बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा मुख्य म्होरक्या संदीप बाळू कांबळेंच्या घरातून एकूण 4 लाख 45 हजार 900 रुपये किंमतीच्या 500 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी सुरू केली असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी संदीप बाळू कांबळे याने स्वतःच्या डोक्यावरचे कर्ज कमी करण्यासाठी बनावट नोटांचा कारखाना सुरू केला असल्याचं समोर आल आहे.
या बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीकडून अनेक खुलासे होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या सहा महिन्यापासून बनावट नोटांचा गोरख धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या सर्व आरोपींनी गर्दीचे ठिकाणी असणारी बाजार पेठ, आठवडी बाजारामध्ये या बनावट नोटा खपवल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बनावट नोटा ही टोळी वितरित करत होती. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात या बनावट नोटा बाजारात आल्या असतील याचा अंदाज न बांधलेलाच बरा.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नकली नोटांचा वापर?
नुकताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देखील या बनावट नोटांचा वापर झाला असण्याचा पोलिसांना संशय आहे. बनावट नोटा बनविणाऱ्या टोळीने उमेदवारांना हाताशी धरून 30 हजाराच्या बदल्यात 1 लाख रुपयांच्या बनावट नोटा दिला असल्याचा संशय पोलिसांना आहे. डोंगराळ भागात असणाऱ्या राधानगरी तालुक्यात याचा वापर जास्त झाला असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केलीय.