18 Aug 2024, 19:57 वाजता
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. हडपसर या भागात रस्त्यावर पाणी साठल्याने अनेक वाहने पाण्यात अडकल्याचं चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. तर काही ठिकाणी झाडे पडण्याच्या ही घटना घडल्या आहेत.
18 Aug 2024, 19:10 वाजता
अजित पवारांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस गुलाबी जॅकेट घालून कार्यक्रम स्थळी
लाडकी बहीण योजनेवरून रंगलेला श्रेयवाद आणि उद्याच्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ कार्यक्रम सुरू झाला आहे. यावेळी अजित पवारांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रम स्थळी गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये दिसले.
18 Aug 2024, 17:02 वाजता
सरडा, ढेकूण म्हणून राज्याचा कायापालट होणार आहे का? अजित पवारांचा सवाल
सरडा आणि ढेकूण म्हणून राज्याचा कायापालट होणार आहे का? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना विचारला आहे. अजित पवारांनी गुलाबी रंगाला आपलंसं केलं. यावरून सरडा ही रंग बदलतो अशी खोचक टीका शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी केली होती. त्याला उत्तर देताना अजित पवारांनी हा सवाल उपस्थित केला. कोण आम्हाला शिव्या देतंय, कोण आम्हाला शाप देतंय तर कोण कोणाला सरडा म्हणतंय अन कोण कोणाला ढेकूण म्हणतंय. पण यामुळं राज्याचे प्रश्न सुटणार आहेत का? राज्याचा कायापालट होणार आहे का? याचं उत्तर विरोधकांनी द्यावं, असं आवाहन अजित पवारांनी केलं. जनसन्मान यात्रेदरम्यान पुण्यातील आंबेगाव विधानसभेत अजित पवारांनी विरोधकांवर असा निशाणा साधला
18 Aug 2024, 16:51 वाजता
पोलीस पुत्राचा हवेत गोळीबार, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं गुन्हा दाखल
पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो हातात रिवॉल्वर घेवून हवेत गोळीबार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तीन वर्षापूर्वीचा असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
18 Aug 2024, 15:07 वाजता
'17 ऑगस्ट हा दिवस लाडकी बहीण दिन म्हणून साजरा करूया'
"सरकार पडेल असं विरोधक म्हणत होते पण सरकार मजबूत होत गेलं त्यामुळे महिला बहीणींच्या खात्यात पैसे जमा झाले. आपल्या सहकार्यामुळे ही योजना यशस्वी झाली आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहणारे हे सरकार आहे. पुन्हा सरकार आल्यास दीड हजाराचे तीन हजार करू. लखपती झालेली बहिण पहायची आहे. अनेक महिलांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते. विरोधक हे सावत्र भाऊ यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा, हाच खऱ्या आर्थाने माहेरचा आहेर आहे. दर महिन्याला ही ओवाळणी आहे. विरोधकांना लाज वाटली पाहिजे. विरोधकांमध्ये मळमळ, जळजळ झाली तरी त्यांना शंभूराज देसाई त्यांना जमाल गोटा देतील. 17 ऑगस्ट हा दिवस मुख्यमंत्री लाडकी बहीण दिन म्हणून आपण साजरा करूया. विरोधकांना खायला कांदी पेढे पाठवा," असं मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यामधील लाडकी बहीण लाभार्थींच्या कार्यक्रमातील भाषणात म्हणाले.
18 Aug 2024, 15:06 वाजता
सर्वात सुपर डूपर हिट कार्यक्रम म्हणजे लाडकी बहीण योजना : मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यामधील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कार्यक्रमात जाहीर भाषण केलं. यावेळी त्यांनी, "महिलांचा महासागर आज पहायला मिळाला. साताऱ्यात कार्यक्रम झाला याचा एक वेगळा आनंद आहे कारण ही माझी जन्मभूमी आहे," असं म्हटलं. पुढे बोलताना, "आम्ही भाग्यवान आहोत कारण आपल्या सारख्या बहिणी मला मिळाल्या. कोट्यवधी बहिणी मला मिळाल्या. हा सर्वात सुपर डूपर हिट झालेला कार्यक्रम आहे," असंही मुख्यमंत्री म्हणाले. "कालच या लाडकी बहीण योजेनेची सुरुवात झाली आहे. 3 हजार कोटी महिला भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत," असं सांगताना मुख्यमंत्र्यांनी या योजनेसाठी राज्य शासनाने 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं सांगितलं आहे.
18 Aug 2024, 14:16 वाजता
उदयनराजेंची लाडक्या बहिणींकडे पाठ? चर्चांना उधाण
माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपुर्ती कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले अनुपस्थित आहेत. उदयनराजे भोसले कार्यक्रमात उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. नक्की कशामुळं उदयनराजे अनुपस्थित आहेत याबाबत चर्चा सुरु आहेत.
18 Aug 2024, 13:08 वाजता
मराठा आरक्षणावरुन संभाजी भिडेंचा आंदोलकांना सवाल! म्हणाले, 'आरक्षण कुठे घेऊन...'
संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातही भाष्य केलं आहे. सांगलीमधील पत्रकार परिषदेमध्ये, "मराठा आरक्षण कळीचा मुद्दा आहे. पण वाघ आणि सिंहाने मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचं आहे. आरक्षण कुठे घेऊन बसलाय?" असं विधान संभाजी भिडेंनी केलं आहे. मागील काही काळापासून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून मराठा आंदोलक महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेताना दिसत आहेत.
18 Aug 2024, 12:46 वाजता
25 ऑगस्टला सांगली बंदची हाक; संभाजी भिडेंची घोषणा
बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार विरोधात 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार, अशी घोषणा शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. सांगलीमधील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
18 Aug 2024, 12:10 वाजता
राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असते तर...; राऊतांचं विधान
उद्धवजींच्या भूमिकेनुसार चेहरा असलेला बरा. राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी असते तर लोकसभेत चित्र वेगळे असते, असं संजय राऊत नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.