Maharashtra Breaking News LIVE: धुळे-सोलापुर महामार्गावरील वाहतूक सुरू

Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या मृत्यूबरोबरच आज दिवसभरामध्ये राजकीय घडामोडी चर्चेत असून याचसंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा...

Maharashtra Breaking News LIVE: धुळे-सोलापुर महामार्गावरील वाहतूक सुरू

24 Sep 2024, 10:39 वाजता

शिंदे-पवारांच्या एकत्रित जागांपेक्षा BJP ला अधिक जागा? आकडा समोर; जळपास शिक्कामोर्तब

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपावर शिक्कामार्तेब झाल्याचं मानलं जात. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या बैठकींचं सत्र, आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदाव्यांनंतर अखेर या तिन्ही पक्षांचं जागा वाटपावर एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे. जागावाटपामध्ये काय ठरल्याची चर्चा आहे हे जाणून घ्या येथे क्लिक करुन...

24 Sep 2024, 09:38 वाजता

बदलापूर रेल्वे स्थानकावर पेढे वाटप

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मृत्यू झाल्यानंतर शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. शिंदे सरकारच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन कार्यकर्त्यांनी केलं आहे.

24 Sep 2024, 09:36 वाजता

नागपूर शहरात मुसळधार पाऊस

नागपूर शहरात मुसळधार पाऊस होतोय. सकाळीच काळेकुट्ट ढग दाटून आले आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरसह विदर्भात येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस दमदार पाऊस राहणार असल्याची शक्यता ही व्यक्त करण्यात आली आहे.

24 Sep 2024, 09:31 वाजता

राज्यात चार दिवस पावसाची शक्यता

राज्यात आजपासून चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून आज पासून बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील हवामान विषयक स्थितीचा परिणाम म्हणून पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस असल्याने पुढील चार दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या उर्वरित भागातही पावसाची हजेरी राहणार आहे.

24 Sep 2024, 09:31 वाजता

तेजीत असलेल्या पालेभाज्यांच्या दरात मोठी घट

पालेभाज्यांची आवक वाढल्याने मेथी, कोथिंबिरीच्या दरात मोठी घट झाली आहे. मात्र अन्य पालभाज्यांचे दर स्थिर आहेत. महिनाभरापासून कोथिंबीर, मेथीसह सर्व पालेभाज्यांचे दर तेजीत होते. मध्यंतरी पावसामुळे पालेभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. आठवड्यापूर्वी कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर 60 ते 70 रुपये होते. तो आता 40 ते 50 रुपयांपर्यंत आला आहे

किरकोळ बाजारातील दर खालीलप्रमाणे : -

- मेथी 20 ते 30

- कोथिंबीर - 20 ते 25

- पालक - 25 ते 30

- शेपू - 25 ते 30

24 Sep 2024, 09:28 वाजता

अजित रानडे यांना दिलासा कायम

पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था या अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांना देण्यात आलेला अंतरिम दिलासा उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या डॉ. रानडे यांच्या याचिकेवरील सुनावणी 25 सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे.

24 Sep 2024, 09:28 वाजता

राहुल गांधींविरोधातील 'तो' खटला पुण्यातील 'एमपीएमएलए' कोर्टात चालणार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर दाखल असलेल्या फौजदारी तक्रारीची सुनावणी आता ‘एमपीएमएलए’ या विशेष न्यायालयात होणार. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयात ही सुनावणी होणार असून, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींविरुद्ध दाखल असलेल्या फौजदारी गुन्ह्यातील प्रकरणांची सुनावणी जलदगतीने व्हावी, यासाठी उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा व सत्र न्यायालयात ‘एमपी एमएलए’ हे विशेष न्यायालय नुकतेच स्थापन करण्यात आले आहे.

24 Sep 2024, 09:26 वाजता

सिनेटमध्ये कोण बसणार? आज मतदान! युवासेना-अभाविपमध्ये थेट लढत

मुंबई विद्यापीठाच्या बहुचर्चित अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी आज, मंगळवारी मतदान होणार असून उद्धवसेनेची युवासेना आणि भाजपप्रणीत अभाविप या दोन संघटनांचे उमेदवार आमने-सामने आहेत. एकूण 28 उमेदवार ही निवडणूक लढवीत असून युवासेना आणि अभाविपच्या प्रत्येकी 10 उमेदवारांत हा सामना रंगेल, अशी चर्चा आहे.

24 Sep 2024, 09:26 वाजता

विक्रम! मुंबई मेट्रोच्या 'या' मार्गावर एका दिवसात पावणेतीन लाख प्रवाशांचा प्रवास

डी. एन. नगर ते दहीसर पूर्व 'मेट्रो २ अ' आणि अंधेरी पूर्व ते दहीसर पूर्व 'मेट्रो 7' या मार्गिकेवर सप्टेंबर महिन्यातील एका दिवसात पावणेतीन लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. एका दिवसातील प्रवासी संख्येने आतापर्यंतचा हा सर्वोच्च आकडा पार करून 2 लाख 81 हजारांचा आकडा गाठला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या मेट्रो मार्गिकांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रवासीसंख्येचा 2 लाख 60 हजारांचा टप्पा पार केला होता.

24 Sep 2024, 09:20 वाजता

महायुतीची महत्त्वाची बैठक

भाजपच्या मतदार संघनिहाय आढावा बैठकीनंतर महायुतीची ही महत्त्वाची बैठक होणार आहे. संभाजी नगरातील या बैठकीला दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील.