जिंतूर : धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदार तोडपाणी करतात. त्यामुळे ते गोपीनाथ मुंडे यांचे वारस होऊ शकत नाहीत, असा घणाघात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केलाय. जिंतूर इथल्या सभेत त्या बोलत होत्या. अनेक घरात भांडणं लावण्याचं काम राष्ट्रवादीने केल्याचा आरोपही पंकजा मुंडे यांनी केला आहे.
'गोपीनाथ मुंडे जेव्हा विरोधी पक्षनेते होते, तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणलं होतं. पण आत्ताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांच्या विरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात', अशी घणाघाती टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.
'तोडपाणी करणारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदार गोपीनाथ मुंडेंचे वारस होऊ शकत नाहीत,' असं पंकजा मुंडे म्हणाल्या. अनेक घरांमध्ये भांडणं लावण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे. मुंडे घराण्यात ते घराणेशाही बोलतात, पण बारामतीला जाऊन चमचेगिरी करतात, असा टोलाही पंकजा मुंडेंनी लगावला. युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे जिंतूरमध्ये आल्या होत्या.
दरम्यान पंकजा मुंडेंच्या या आरोपाला धनंजय मुंडे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी वारस नाही. वारसा फक्त पंकजा मुंडे चालवत आहेत. वैद्यनाथ कारखान्यावर जप्ती आली. हा वारसा तुम्ही सांभाळत आहात काय? बीड जिल्ह्याला मागसलेपणाचा कलंक लागला आहे. तुम्ही ५ वर्ष सत्तेत होतात, पण बीड जिल्ह्याला काय दिलं? निवडणूक आली की गोपीनाथ मुंडेंचे वारस असल्याचं भान येतं, पण मागच्या ५ वर्षात गोपीनाथ मुंडेंना अभिप्रेत असलेलं काम तुमच्याकडून झालं नाही, अशी टीका धनंजय मुंडेंनी केली.